भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अखेर उपरती 

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक व्हिडीयो संदेश देत भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव मांडला. युद्धाने कुठल्याही देशाचे भले झाले नाही. युद्धाचा शेवट हा विनाशच असतो, असे सांगत त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.
पाकिस्तानमध्ये वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीनंतर इम्रान यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. पुलवामामध्ये जी दु:खद घटना घडली तिची चौकशी करण्यास व दहशतवादासंदर्भात चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. मोठ्या युद्धामध्ये नेहमी गणितं चुकतात अस सांगत त्यांनी पहिले-दुसरे महायुद्ध, अमेरिकेच्या अफगाणिस्तान व व्हिएतनाममधली युद्धांचा दाखला दिला.

पाकिस्तानला कुठल्या नागरी किंवा लष्करी तळावर हल्ला करायचा नव्हता तर फक्त आपली शक्ती दाखवायची होती. भारताचे दोन पायलट आमच्या ताब्यात आहेत, असा दावा इम्रान खान यांनी केला. पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही पुरावे देण्याची मागणी केली होती. मात्र भारताने पुरावे दिले नाही, उलट पाकिस्तानच्या हद्दीत येवून हल्ले केले. परिस्थिती अशीच चिघळत राहिली तर माझ्या आणि नरेंद्र मोदी यांच्या हातातही काही राहणार नाही. आम्ही सर्व विषयावर चर्चा करण्यास तयार आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये युद्धग्रस्त परिस्थिती ओढवली असून भारताने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाकिस्तान मवाळ भूमिका घेताना दिसत आहे.

अणुविषयक समितीची बोलाविली बैठक

भारताच्या आक्रमक पवित्र्याने बिथरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुविषयक समितीची बैठक बोलावली आहे. पाकिस्तानचे अणुविषयक धोरण ठरविण्याची, संशोधनासंबंधी निर्णय घेण्याची व नियंत्रणाची संपूर्ण जबाबदारी नॅशनल कमांड ऑथॉरिटीकडे (एनसीए) आहे. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर काल पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली होती. त्यात अणुविषयक समितीशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इम्रान खान यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही महत्त्वाची चर्चा होण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.