भूतानच्या अमर्याद क्षमतांना भारताचे प्रोत्साहनच

भूतानच्या विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांचा संवाद

थिम्फू (भूतान) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानमधील विद्यार्थ्यांबरोबर मनमोकळा संवाद साधला. असाधारण कृती करण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. या सामर्थ्याचा आणि क्षमतेचा परिणाम आगामी पिढ्यांसाठी होईल, असा आशावाद पंतप्रधानांनी यावेळी व्यक्‍त केला. भूतानमधील रॉयल विद्यापिठामध्ये झालेल्या या संवादादरम्यान आपल्या देशाला नवी उंची प्रदान करण्यासाठी मोदींनी भूतानमधील विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची प्रेरणा दिली.

आगमी काळात अनेक आव्हाने समोर असणार आहेत. त्यापैकी प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी युवकांच्या मनातील नाविन्यपूर्ण कल्पनांच्या उपाय योजना आहेत. कोणत्याही मर्यादांना बळी पडू नका, असे मोदींनी या विद्यार्थ्यांना सांगितले.
युवावस्थेसाठी सध्यापेक्षा अधिक चांगला असा कोणताही कालावधी नाही. यापूर्वी जेवढी संधी दिली गेली नसेल, तेवढी संधी जगाने पुढे आणून ठेवली आहे. अमर्याद क्षमता आणि असामान्य कर्तृत्व तुमच्याठायी आहे. या असामान्य क्षमतेचा उपयोग भावी पिढ्यांना होणार आहे. आतला आवाज ऐका आणि पूर्ण एकाग्रतेने त्याचा पाठपुरावा करा, असे मोदी म्हणाले. या संबोधनसत्राच्यावेळी भूतानचे पंतप्रधान लोटे त्शेरिंग हे देखील उपस्थित होते.

भूतानची उन्नती होत असताना 1.3 अब्ज भारतीय केवळ प्रोत्साहन्‌ देत राहणार नाही. तर विकसामध्ये ते तुम्हाबरोबर भागीदारीही करतील. तुमच्याबरोबर कष्टात सहभागी होतील आणि तुमच्याकडूनच शिकतीलही, असे मोदी म्हणाले.
यावेळी विभिन्न क्षेत्रातील भारताच्या ऐतिहासिक परिवर्तनाचा आलेखही मोदींनी यावेळी मांडला. शाळेपासून अंतराळापर्यंत, डिजीटल पेमेंटपासून आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व क्षेत्रात भारत व्यापक सहकार्य करण्यास तयार आहे. भारतातील “नॅशनल नॉलेज नेटवर्क’ आणि भूतानमधील “ड्रंकरेन’मधील भागीदारी हे त्याचेच उदाहरण असल्याचे मोदींनी सांगितले.

भारतातील संशोधन केंद्रे, ग्रंथालये, आरोग्य सेवा आणि कृषी विद्यापिठांबरोबर शैक्षणिक विद्यापिठांशी संलग्नतेचा पूर्ण वापर करण्याचे आवाहन मोदींनी केले. उपग्रहाद्वारे टेलिमेडिसीन, दूरशिक्षण, रिसोर्स मॅपिंग, हवामान अंदाज आणि नैसर्गिक आपत्तीबाबतचे इशारेही मिळू शकतील.

त्यासाठी “इस्रो’साठी थिंफू ग्राऊंड स्टेशनचे उद्‌घाटन केल्याने अंतराळ संशोधनात भागीदारी झाल्याचेही त्यांनी नमूद केले. भूतानच्या युवा संशोधकांनी भारतात येऊन भूतानचा छोटा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्‍त केला. अर्वाचीन काळात बौद्ध शिक्षक आणि विद्वानांनी मिळून भारत आणि भूतानमध्ये सांस्कृतिक पूल बांधला आहे. त्यामुळे नालंदासारख्या विद्यापिठांमध्ये बौद्धतत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी भूतानच्या विद्यार्थ्यांना मोदींनी निमंत्रित केले.

जलविद्युत आणि उर्जा क्षेत्रात भूतानबरोबर व्यापक सहकार्य करण्यासाठी नेहमीच नागरिक हेच या द्विपक्षीय संबंधांच्या केंद्रस्थानी असतील, असे भारत आणि भूतानच्या ऐतिहासिक संबंधांची साक्ष देताना मोदींनी सांगितले. मोदींनी युवकांसाठी लिहीलेल्या पुस्तकाचा संदर्भ भूतानच्या पंतप्रधानांनी फेसबुकवर दिला होता. त्याचाही उल्लेख मोदींनी यावेळी केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×