अमेरिका, जपान आणि फिलीपाईन्ससह केला संयुक्त युद्धाभ्यास
टोकियो: अमेरिका, भारत, जपान आणि फिलीपाईन्स या देशांनी दक्षिण चीन समुद्रात चीनचा दावा असलेल्या जलमार्ग क्षेत्रात संयुक्त नौदल अभ्यास करत शक्तिप्रदर्शन केले आहे. या सागरी अभ्यासात अमेरिकेची विध्वंसक युद्धनौका, भारताच्या दोन युद्धनौका, जपानची विमानवाहू युद्धनौका आणि फिलीपाईन्सची गस्तनौका सहभागी झाल्या.
या संयुक्त नौदल अभ्यासाबाबत अमेरिकेच्या नौदलाचे कमांडर ऍन्ड्रयू जे क्लग म्हणाले, आमचे सहकारी, भागीदार आणि मित्रदेशांसोबत संबंध प्रगाढ करण्याची ही संधी आहे. क्लग हे अमेरिकची विध्वंसक युद्धनौका युएसएस विलियम पी लॉरेन्सचे कॅप्टन आहेत. आठवडाभर चाललेला सागरी युद्धाभ्यास संपुष्टात आला असून जपानने स्वतःच्या दोन विमानवाहू युद्धनौकांपैकी एक इजुमोला युद्धाभ्यासासाठी पाठविले होते. तर भारताच्या आयएनएस कोलकाता आणि टॅंकर आयएनएस शक्तीने या युद्धाभ्यासात भाग घेतला.
युद्धाभ्यासादरम्यान अमेरिकेच्या दोन युद्धनौका दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या कृत्रिम बेटाजवळून गेल्या होत्या. यावर चीनने आक्षेप घेत स्वतःच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाल्याच आरोप केला होता. तर जगभरातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रामध्ये स्वतंत्र संचारासाठी अशाप्रकारच्या मोहिमांचे आयोजन केले जात असल्याचे प्रत्युत्तर अमेरिकेने चीनला दिले होते.
पूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीन दावा करत असल्याने या क्षेत्रात तणावाची स्थिती आहे. तर या क्षेत्रातील देश बुनेई, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाईन्स, तैवान आणि व्हिएतनामही दक्षिण चीन समुद्रावर स्वतःचा दावा करतात.