इंटरपोलवर भारताचा राजकीय दबाव – झकीर नाईक

रेड कॉर्नर नोटीशीबाबत झकीर नाईकची प्रतिक्रिया

नवी दिल्ली – वादग्रस्त इस्लामी व्याख्याता झकीर नाईकच्या विरोधात इंटरपोलने “रेड कॉर्नर’ नोटीस बजावण्याची भारताची मागणी स्वीकारली आहे. मात्र या नोटीशीसाठी भारत सरकारकडून “इंटरपोल’वर राजकीय दबाव आणला जात आहे आणि आपल्याविरोधात राजकीय सूडाचे नाट्य केले जात असल्याचा आरोप नाईक याने केला आहे.

भारताकडून इंटरपोलवर जो राजकीय दबाव आणला जात आहे, त्याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. हा एक राजकीय सूडाचा एक भाग आहे. मात्र या संदर्भात काही अन्य देशांकडून या बातमीची सत्यता पडताळली असता आपल्याविरोधात कोणतीही “रेड कॉर्नर’ नोटीस बजावण्यात आलेली नाही, असे नाईक याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आपल्याविरोधात इंटरपोलने “रेड कॉर्नर’ नोटीस बजावल्याचा निष्कर्श एका भारतीय वर्तमानपत्राने स्वतःच काढला आहे. आपल्याविरोधात “रेड कॉर्नर’ बजावली जावी, असे वाटत असल्याने त्यासाठीचा भारत सरकारचा उतावीळपणाच यातून दिसून येतो. हा उतावीळपणा गेल्या दोन वर्षांपासून दिसतो आहे, असे झाकीर नाईकने म्हटले आहे.

इंटरपोलने आपल्याविरोधातली “रेड कॉर्नर’ नोटीस यापूर्वी एकदा रद्द केली आहे. भारताने दिडवर्षापूर्वी आपल्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आणि इंटरपोलवर दबाव आणायला सुरुवात केली आहे. अशा कोणत्याही दबावाला इंटरपोल बळी पडेल, असे आपल्याला वाटत नसल्याचेही झकीर नाईकने म्हटले आहे.

झकीर नाईक सध्या मलेशियात असल्याचे बोलले जात आहे. 2016 साली सरकारने त्याच्या “इस्लामिक रिसर्च फौंडेशन’वर बंदी घातली. बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली “एनआयए’ आणि अन्य तपास संस्थांकडून नाईकविरोधात तपास सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.