दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू असा नवा पुरस्कार सुरू केला आणि या पहिल्याच पुरस्काराचा मान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत ठरला आहे.
जानेवारी महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत होता. या मालिकेत पंतने दोन डावात संस्मरणीय खेळी केल्या. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने 97 धावांची धडाकेबाज खेळी होती. तर चौथ्या सामन्यात त्याने नाबाद 89 धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या याच खेळीमुळे त्याला जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पंतने जानेवारी महिन्यात 4 डावांत 245 धावा केल्या. 81.66 च्या सरासरीने त्याने धावा केल्या. त्याने 4 झेल टिपले. तसेच एका सामन्यात सामनावीराचा किताबही मिळवला. त्यामुळे आयसीसीच्या मतदान समितीने आणि चाहत्यांनी मिळून या पुरस्कारासाठी पंतची निवड केली.
असा ठरवला जातो विजेता….
आयसीसीकडून दर महिन्याला पुरुष व महिला अशा दोन्ही प्रकारात महिन्यातील 3 सर्वोत्तम क्रिकेटपटूंची नामांकने दिली जातात. खेळाडूचा मैदानावरील पराक्रम, वावर व त्या ठरावीक महिन्यात केलेले विक्रम याचा विचार करून हे तीन खेळाडू नामांकित केली जातात. एकूण मतदानाच्या टक्केवारीपैकी आयसीसीच्या मतदान समितीकडे 90 टक्के तर चाहत्यांकडे 10 टक्के मतदानाचे अधिकार असतात. आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर चाहत्यांना आपले मत नोंदवता येते. विजेत्या खेळाडूंचे नाव दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जाहीर करण्यात येते.