नवी दिल्ली – लुसाने येथे होणाऱ्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू निरज चोप्रा खेळणार आहे. स्नायूंच्या दुखापतीतून सावरलो असून सरावही सुरू केल्याचे त्याने सांगितले. येत्या 26 ऑगस्ट पासून डायमंड लीग स्पर्धा लुसाने शहरात सुरू होत आहे.
निरज चोप्राने अधिकृत ट्वीटर खात्यावरून स्वतःच्या फिटनेसची माहिती दिली. निरजने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पूर्णपणे फिट आणि शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी तयार. समर्थन करण्यासाठी सर्वांचे आभार. लुसानेमध्ये भेटुयात”
Feeling strong and ready for Friday. Thanks for the support, everyone.
See you in Lausanne! @athletissima pic.twitter.com/wx52umcVtm— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 23, 2022
या स्पर्धेत सरस कामगिरी करत याच गटातील अंतिम फेरीत पात्र ठरण्याची त्याला संधी आहे. नीरजला दुखापतीमुळे नुकत्याच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. स्पर्धेच्या दोन दिवस आधी त्याने माघारीचा निर्णय घेतला होता. तसेच त्याला वैद्यकीय तज्ज्ञांकडून एक महिना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता.
दरम्यान, डायमंड लीगच्या आयोजकांनी जाहीर केलेल्या स्पर्धकांच्या यादीत नीरजचा समावेश होता. मात्र, त्यावेळी तो तंदुरुस्त ठरला नसल्याने त्याच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.