नवी दिल्ली- डिसेंबर महिन्यातील कारखान्यातील उत्पादकता वाढल्याची माहिती समोर आली आहे.
डिसेंबर महिन्यातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स म्हणजे पीएमआय तब्बल 56.4 टक्के भरला आहे. हा निर्देशांक 50 च्या वर असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारत असल्याचे समजले जाते. सध्या हा निर्देशांक 50 पेक्षा कितीतरी अंकांनी पुढे गेला आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा पीएमआय 56.3 टक्के होता. म्हणजे आता हे क्षेत्र खात्रीने पुनरुज्जीवित झाले असल्याचे दिसून येते. गेल्या पाच महिन्यांपासून हा निर्देशांक 50 अंकाच्या पुढे आहे.
विेश्षकांनी सांगितले की, ही आकडेवारी सकारात्मक आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र पूर्णपणे पूर्वपदावर येत असल्याची लक्षणे यातून स्पष्ट दिसून येतात. त्यामुळे जीएसटी संकलन गेल्या काही महिन्यापासून वाढत असल्याचे सांगण्यात आले.
केवळ मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे उत्पादन वाढत नाही तर या उत्पादनाला बाजारपेठेतून पुरेशी मागण्यात असल्याचे दिसून येते. जागतिक बाजारातूनही भारतीय कंपन्यांकडे येत असलेल्या ऑर्डरचे प्रमाण वाढत असल्याचे हा निर्देशांक तयार करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे.
मात्र अजूनही रोजगार निर्मिती पूर्वपदावर आलेले नाही. ती लवकरच येण्याची शक्यता आहे. पहिल्या तिमाहीपेक्षा दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी सकारात्मक होती. आता तिसऱ्या तिमाहीतील आकडेवारीही सकारात्मक होण्याची शक्यता असल्याचे दिसून येते. लवकरच सेवाक्षेत्राचा निर्देशांक जाहीर होणार आहे. त्यावरून दोन्ही क्षेत्राचा अंदाज येऊ शकणार आहे.