भारताच्या कबड्डी संघाला दुहेरी सुवर्ण

सॅग क्रीडा स्पर्धा : व्हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी, मुष्टियुद्ध व टेटेत मक्‍तेदारी
काठमांडू, दि. 9 -भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील (सॅग क्रीडा स्पर्धा) वर्चस्व सोमवारीही कायम राखले. व्हॉलीबॉल, फुटबॉल, जलतरण, कबड्डी, मुष्टियुद्ध व टेटेत मक्‍तेदारी निर्माण करताना आणखी जवळपास 20 पदके निश्‍चित केली आहेत. भारताच्या पुरुष व महिला कबड्डी संघांनी सुवर्णपदक पटकावले.

या संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अविश्‍वसनीय कामगिरी केली आहे. सोमवारी भारताच्या पुरुष व महिला संघांनीही अंतिम लढतीत थाटात विजयाची नोंद करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुष संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 51-18 असा धुव्वा उडविला. महिला संघानेही नेपाळवर 50-13 अशी मात केली. भारताच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघांना सामन्यात सातत्याने दडपणाखाली ठेवत पूर्ण वर्चस्व गाजविले. भारताच्या फुटबॉल संघानेदेखील सुवर्णपदकाची कमाई करताना अंतिम सामन्यात यजमान नेपाळचा 2-0 असा सहज पराभव केला. भारताकडून अव्वल खेळाडू बाला देवीने 18 व्या आणि 56 व्या मिनिटाला गोल केले.

भारताने कुस्ती, जलतरण, मुष्टियुद्ध, हॅंडबॉल, मैदानी व नेमबाजी या खेळांमध्ये आणखी जवळपास 20 पदके निश्‍चित केली आहेत. कुस्तीपटूंनी पदकांची लयलूट कायम ठेवत भारताला पदकांचे त्रिशतक साकारण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. जलतरणपटूंनी 7 सुवर्णपदकांसह 2 रजत व 2 ब्रॉंझपदके पटकाविली. भारताला हॅंडबॉलमध्ये एक सुवर्ण आणि एक रजतपदक मिळाले. महिलांमध्ये भारताने सुवर्णपदकाची कमाई केली तर पुरुषांना रजतपदकावर समाधान मानावे लागले. तलवारबाजीत भारताने सगळी सुवर्णपदके जिंकली.

एपी, सॅबर आणि महिलांच्या फॉइल प्रकारात भारत अव्वलस्थानी आहे. जलतरणातही भारताने पदकांची रास ओतली. कुशाग्र रावतने 400 मीटर फ्रीस्टाइलचे सुवर्णपदक जिंकले. आनंद शैलजाने 4 मिनिटे 1.2 सेकंद अशी वेळ देत रजतपदक मिळविले. पुरुषांच्या 200 मीटर बटरफ्लायमध्ये सुप्रिय मोंडलने 2 मिनिटे 2.45 सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदकाची कमाई केली. मिहीर आंब्रेने ब्रॉंझपदक जिंकले. भारतीयांनी 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात सुवर्णपदकांची नोंद केली. अपेक्षा फर्नांडिसने 200 मीटर बटरफ्लायमध्ये 2 मिनिटे 21.83 सेकंद अशी वेळ देत आणखी ऐका सुवर्णपदकावर नाव कोरले.

कुस्तीत भारताने सगळी सुवर्णपदके पटकाविली. 62 किलो वजनीगटात साक्षीने सुवर्णपदक जिंकले तर रवींदरने पुरुषांच्या 61 किलो वजनीगटात सुवर्णपदकाची कमाई केली. मुष्टियुद्धात भारताने सात पदके निश्‍चित केली आहेत. त्यात विकास क्रिशन, पिंकी राणी यांचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.