साउदम्पटन -कर्णधार विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांनी थोडीफार चमक दाखवल्याने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताला पहिल्या डावात द्विशतकी मजल मारता आली. भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपला. न्यूझीलंडच्या काएल जेमिसनने 5 गडी बाद केले.
खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात भारताला दमदार उत्तर देताना 2 गडी गमावून 101 धावा केल्या. ते अद्याप 116 धावांनी पिछाडीवर आहेत.
भारताच्या 217 धावांना उत्तर देताना न्यूझीलंडने भक्कम प्रारंभ केला. सलामीवीर टॉम लॅथम व डेव्हन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी दिली व भारताच्या वेगवान गोलंदाजीतील हवाच काढून घेतली. रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर लॅथम 30 धावांवर बाद झाला.
त्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने कॉनवेला सुरेख साथ दिली. कॉनवेने अर्धशतक पूर्ण केले मात्र, त्यानंतर त्याला इशांत शर्माने बाद केले. यानंतर रॉस टेलर फलंदजीला आला. मात्र, त्याचवेळी अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला. विल्यमसन 12 धावांवर नाबाद राहिला तर टेलरने अद्याप खाते उघडलेले नाही.
रविवारी अंधूक प्रकाशामुळे खेळ अर्धा तास उशिरा सुरू झाला. भारताने 146 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. कर्णधार कोहली आणि रहाणे यांनी सावध फलंदाजी केली. मात्र, कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
तो 44 धावांवर काएल जेमिसनच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाल्यावर रहाणेला एकही फलंदाज साथ देऊ शकला नाही. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी केलेल्या ऋषभ पंतनेही निराशा केली. रविवारचा खेळ सुरू झाल्यावर कोहली व रहाणेने मोठ्या खेळीची आशा दाखवली होती.
मात्र, कोहलीपाठोपाठ रहाणेही अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज नील वॅगनरने रहाणेला 49 धावांवर बाद केले. त्यानंतर रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी भारताला द्विशतकी मजल मारून दिली. 3 चौकारांसह 22 धावांची खेळी केल्यानंतर टीम साऊदीने अश्विनला बाद केले.
त्यानंतर जेमिसनने ईशांत शर्मा व जसप्रीत बुमराहला बाद केले. ट्रेन्ट बोल्टने अष्टपैलू रवींद्र जडेजाला बाद करत भारताचा डाव संपवला. न्यूझीलंडकडून जेमिसनने 31 धावांत 5 बळी घेतले. बोल्ट आणि वॅगनरने प्रत्येकी 2 बळी घेतले.
गृहपाठ निरुपयोगी ठरला
या सामन्यासाठी सज्ज होत असताना भारताच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी केलेला गृहपाठ निरुपयोगी ठरला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे स्विंग हे सर्वात प्रभावी अस्त्र निकामी करता यावे, यासाठी विविध प्रकारचा सराव कर्णधार विराट कोहलीसह जवळपास सर्वच भारतीय फलंदाजांनी केला होता. मात्र, प्रत्यक्ष सामन्यात ते साफ अपयशी ठरले.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव – 92. 1 षटकांत सर्वबाद 217 धावा. (अजिंक्य रहाणे 49, विराट कोहली 44, रोहित शर्मा 34, शुभमन गिल 28, रवीचंद्रन अश्विन 22, रवींद्र जडेजा 15, काएल जेमिसन 5-31, नील वॅगनर 2-40, ट्रेन्ट बोल्ट 2-47, टीम साऊदी 1-64).
न्यूझीलंड पहिला डाव – 49 षटकांत 2 बाद 101 धावा. (टॉम लॅथम 30, डेव्हन कॉनवे 54, केन विल्यमसन खेळत आहे 12, रॉस टेलर खेळत आहे 0, इशांत शर्मा 1-19, रवीचंद्रन अश्विन 1-20.