नवी दिल्ली – परदेशी गुंतवणूक वाढत असल्यामुळे भारताकडी परकीय चलन साठ्यात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून 12 मार्च रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, देशातील एकूण विदेशी चलन गंगाजळीने 582 अब्ज डॉलरचे प्रमाण गाठले आहे. रशियाची गंगाजळी घसरून 580.1 अब्ज डॉलरवर आली आहे.
चीन, जपान आणि स्वित्झर्लंडनंतर, सर्वाधिक विदेशी चलन धारण करणारा देश म्हणून भारताने स्थान मिळविले आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून विदेशी चलन साठ्याची आकडेवारी जाहीर केली जाते. मध्यवर्ती बॅंकेकडे देशाच्या आयातविषयक गरजा भागवू शकेल, इतका मुबलक विदेशी चलनाचा साठा असणे हे अर्थव्यवस्थेच्या सुदृढतेचे लक्षण मानले जाते.
शिवाय, विदेशातून उभारल्या जाणाऱ्या कर्जाची यातून परतफेड होऊ शकेल, असा विदेशी गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यासही ही बाब कारणीभूत ठरू शकते. सध्या उपलब्ध चलन गंगाजळीतून भारताला पुढील 18 महिन्यांसाठी देशाच्या आयातीचा खर्च भागविता येणार आहे.