मुंबई – वाणिज्य मंत्रालय आणि रिझर्व बँक विविध देशांसोबत डॉलरऐवजी रुपया व इतर चलनाच्या माध्यमातून व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे परकीय चलन संवर्धन अपेक्षित आहे. दरम्यानच्या काळामध्ये परदेशी गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात वाढली आहे. यामुळे भारताकडील परकीय चलन साठा 14 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात 305 दशलक्ष डॉलरने वाढून 654 अब्ज डॉलर या समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे.
या अगोदरच्या आठवड्यात चलन साठ्यात तब्बल 12 अब्ज डॉलरची वाढ झाली होती. रिझर्व बँकेने भांडवल सुलभता वाढविण्यासाठी 10 अब्ज डॉलर खरेदी केल्यामुळे या आठवड्यात रुपयांच्या मूल्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली होती असे समजले जाते. सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या रिझर्व बँकेने व्याजदरात अर्धा टक्के कपात केल्यानंतर बरेच परकीय चलन भारतात येऊन भारताकडील परकीय चलन साठा 704 अब्ज डॉलरपर्यंत वाढला होता.
मात्र नंतर घसरणारा रुपया रोखण्यासाठी रिझर्व बँकेने बर्याच डॉलरची विक्री केल्यामुळे सध्या परकीय चलन साठा काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र हा साठा भारताला वर्षभर आयातीसाठी पुरेल इतका असल्यामुळे या आघाडीवर फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे समजले जाते.
दरम्यान संबंधित आठवड्यामध्ये जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढल्यामुळे रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य 66 दशलक्ष डॉलरने वाढून 74.3 अब्ज डॉलर या पातळीवर गेला आहे. भारताची नाणेनिधी कडे 4. 4 अब्ज डॉलरची ठेव आहे. आता डॉलर कमकुवत होत असल्यामुळे भारतात परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या साठ्यात आणखी वाढ होत राहण्याची शक्यता जास्त असल्याचे विश्लेषकांना वाटते.