भारतातील करोना रुग्णावरील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी

नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसवर अद्यापही सुरक्षित आणि प्रभावी अशी लस आणि औषध नाही. अशात कोरोनाग्रस्तांसाठी आता आशेचा किरण आहे, ते प्लाझ्मा थेरेपी. भारतात कोरोना रुग्णावरील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी ठरली आहे.

दिल्लीतील एका खासगी रुग्णालातील 49 वर्षीय गंभीर कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले. उपचारानंतर चार दिवसांतच या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून आले. एका खासगी रुग्णालयातील या रुग्णाला वेंटिलेटरवरून हटवण्यात आले आहे. त्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात येते आहे. या रुग्णालयात एकाच कुटुंबातील अनेक कोरोना रुग्ण दाखल होते. त्यापैकी दोघे वेंटिलेटरवर होते. वेंटिलेटरवरील एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर प्लाझ्मा थेरेपी सुरू करण्यात आली.

याआधी एबोलासारख्या आजारावर वापरण्यात आलेली ही उपचार पद्धती कोरोनावरही परिणामकारक ठरत असल्याचे आता काही अभ्यासात दिसून आले आहे. अमेरिकेत पाच करोनाग्रस्तांवर याच पद्धतीने उपचार करण्यात आले. रुग्ण बरे झाले, त्यामध्ये तीन भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे. ह्युस्टनमधील बेलर सेंट ल्युक मेडिकल सेंटरमध्ये रुग्ण भरती होते. महाराष्ट्र सरकारनेही केंद्र सरकारकडे प्लाझ्मा थेरेपीने कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

जो रुग्ण तीन आठवड्यांपूर्वी बरा झाला आहे, त्यांच्या रक्तातील प्लाज्मा घेतले जातात. एका व्यक्तीच्या रक्तातून जास्तीत जास्त 800 मिलीलीटर प्लाज्मा घेतला जाऊ शकतो, तर करोना रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज टाकण्यासाठी 200 मिलीमीटर प्लाझ्मा चढवला जातो.

करोना व्हायरसशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्या रक्तात या अँटिबॉडीज कायम असतात. अशा व्यक्तीच्या रक्तातील प्लाज्मा अशा रुग्णाच्या शरीरात सोडले जातात. जेणेकरून त्या प्लाज्मातील अँटिबॉडीज रुग्णाच्या शरीरातील व्हायरसशी लढतील. याला सरकारकडून परवानगी मिळाल्यास मोठ्या संख्येने रुग्णांवर ही उपचार पद्धती वापरून त्यांना वाचवता येईल. मात्र त्यासाठी करोनावर मात केलेल्या रुग्णांनी रक्तदान करणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.