नवी दिल्ली – मोठमोठ्या शहरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना घर घेणे किंवा स्वत:च्या जागेवर घर बांधणे दुरापास्त होत चाललं आहे. त्यातच सिमेंट आणि लोखंडाचे दर गगनाला भिडले आहेत. आता यावर मात करण्यासाठी 3D प्रिंटेड घराचा पर्याय आला असून या घराला बांधण्यासाठी वेळ आणि पैसा कमी लागतो.
भारतात 3D प्रिंटेड तंत्रज्ञानाचा वापर करून पहिलं घर बांधण्यात आलं आहे. थ्री डी तंत्रज्ञान हे असे एक तंत्र आहे, ज्याचा वापर करून कमी वेळेत, कमी खर्चात चांगले घर बांधता येऊ शकते. चेन्नईमधील या घराचं उद्घाटन अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे केलं.
आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी तिव्हस्ता मॅन्यूफॅक्चरिंग सोल्युशन्स नावाने स्टार्टअप सुरु केले आहे. या स्टार्टअपने भारतातील हे पहिले घर उभे केले आहे. ६०० चौरस फुटाचे हे घर फक्त पाच दिवसांत बांधलं गेलं आहे. जर हेच घर पारंपारिक पद्धतीने बांधले असते तर त्यासाठी किमान १५ दिवस लागले असते. या पद्धतीच्या घरामुळे वेस्टेजही खुप कमी होते.
तिव्हस्ताने हे घर बांधण्यासाठी आपले स्वत:चे मटेरियल विकसित केले आहे. सिमेंट, वाळू, जिओपॉलिमर आणि फायबर्सचा यात समावेश आहे. हे एक वेगळ्या प्रकारचे कॉंक्रिट आहे. यात सिमेंट पाण्याचे मिश्रणही कमी लागते.
दरम्यान 3D प्रिंटेड घरं बांधण्यासाठी पाच ते साडेपाच लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. हे घर ५० ते ६० वर्षे टिकू शकते. भारतातील अवाढव्य लोकसंख्येचा विचार करता अशा पद्धतीची घरे सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरतील.