गेल्या काही वर्षांमध्ये भारतातून होणारी संरक्षण सामग्रीची निर्यात वाढलेली आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भारतातून अमेरिका, फ्रान्स आणि आर्मेनिया तीन देशांमध्ये सर्वाधिक संरक्षण साहित्याची निर्यात होते. 2023-24 या आर्थिक वर्षात या तीन देशांना भारतातील विविध कंपन्यांनी 21083 कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याचे निर्यात केलेली आहे.
भारतातील सरकारी मालकीच्या आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी विविध प्रकारची शस्त्रास्त्रे जवळपास 100 देशांमध्ये निर्यात केलेली आहेत. या शस्त्रांमध्ये ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईल, तोफा, रडार यंत्रणा, आकाश क्षेपणास्त्रे, पिनाका रॉकेट्स आणि सशस्त्र वाहनांचा समावेश आहे.
आकाश एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम आणि पिनाका मल्टी लॉन्च रॉकेट सिस्टीम तसेच 155 मिलिमीटर तोफांच्या भारताकडून घेणारा आर्मेनिया हा सगळ्यात मोठा देश ठरलेला आहे. भारतात विकसित करण्यात आलेली आकाश एअर डिफेन्स मिसाईल्स सिस्टीम घेणारा आर्मेनिया हा पहिला देश ठरलेला आहे. या यंत्रणेद्वारे 25 किलोमीटर परिघात आलेल्या क्षेपणास्त्राच्या मार्गात हस्तक्षेप करता येतो.
दरम्यान अमेरिकेला निर्यात करण्यात येणाऱ्या संरक्षण साहित्यामध्ये विमान आणि हेलिकॉप्टर च्या सुट्या भागांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर काम करणाऱ्या बोईंग आणि लॉकहीड मार्टिन या कंपन्यांसाठी या सुट्या भागांची निर्यात केली जाते.
मिसाईल, तोफा, शस्त्रे टिपणारी रडार रॉकेट सिस्टीम, नाईट विजन इक्विपमेंट या गोष्टींसाठी आर्मेनियाने भारताबरोबर गेली चार वर्ष करार केलेला आहे. विविध प्रकारचा दारूगोळा तोफ गोळे देखील आर्मेनियाला भारतातून निर्यात केले जातात. काही वर्षांपूर्वी आर्मेनिया आणि शेजारील अझरबैजान या देशांमध्ये संघर्ष उफाळून आल्यानंतर आर्मेनियाने भारताकडून शस्त्रे मिळवणे सुरू केले. त्याचे प्रमुख कारण म्हणजे टर्की आणि पाकिस्तान हे देश अझरबैजान देशाला पाठबळ देत असतात.
या देशांखेरीज ब्राझीलनेही वेपन सिस्टीमच्या अत्याधुनिकीकरणासाठी भारताबरोबर सह उत्पादन आणि सहविकासाची तयारी दाखवलेली आहे. आखातातील देश तसेच आशियामधील देशांनी देखील भारत सरकारशी संपर्क साधला असून ब्राह्मोस क्षेपणास्त्रे या देशांना हवी आहेत. ही क्षेपणास्त्रे भारताने रशियाबरोबर विकसित केलेली आहेत.