क्रिकेटच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या भारतात क्रिकेटेतर खेळांची वर्षानुवर्षे उपेक्षा होत गेली. अन्य क्रीडा प्रकारातील खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी करत आपल्यातील क्रीडाकौशल्याने देशाचे नाव जागतिक पटलावर उंचावले खरे; पण क्रिकेटमधील विजयानंतर दिसून येणारा अतीव उत्साह, जल्लोष, अफाट लोकप्रियता या क्रीडाप्रकारांना लाभली नाही!
अलीकडच्या काही वर्षांमध्ये बॅडमिंटन, कुस्ती, नेमबाजी, कबड्डी, भालाफेक यांसारख्या क्रीडा प्रकारातील चमकदार खेळाडूंना भारतीय क्रीडाप्रेमीं कडून कौतुकाची थाप मिळाली, पण क्रिकेटच्या सामन्यांमधील विजयानंतर ज्याप्रमाणे आनंदाचे भरते येते आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सेलिब्रेशन होते तशा प्रकारचे कौतुक या खेळाडूंच्या वाट्याला कधी आले नाही.
बुद्धिबळासारखा खेळ अगदी बालवयापासून गावाखेड्यांपासून शहरे-महानगरांमध्येही खेळला जातो. परंतु या क्षेत्रातील चमकदार खेळाडूंची नावे सांगा असं विचारल्यास जगज्जेता विश्वनाथ आनंदखेरीज अन्य नावे सांगणारे हजारात दहा जणही भेटणार नाहीत. त्यामुळेच डी गुकेश या तरुण, तडफदार बुद्धिबळपटूने जागतिक अजिंक्यपद मिळवण्याचा महाविक्रम करूनही त्याचा म्हणावा तेवढा आनंद देशात दिसला नाही. अर्थात, त्यामुळे त्याच्या यशाचं मोल तसूभरही कमी होत नाही. डी गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला आणि विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे.
डी गुकेश याने सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महाअंतिम सामन्यात डिंग लिरेन याच्यावर मात करत ही कामगिरी केली आहे. डी गुकेशने 14 डावांनंतर साडेसात आणि साडेसहा अशा फरकाने पराभव करत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. गुकेश वर्ल्ड चॅम्पियन होणारा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्याने ही जगज्जेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. या यशामुळे तब्बल 12 वर्षांनंतर भारताला नवा चॅम्पियन मिळाला आहे. डी गुकेशआधी 2012 साली विश्वनाथन आनंद यांनी जागतिक अजिंक्यपदावर आपले नाव कोरले होते.
अथक प्रयत्नांनंतर भारताला जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत महाशक्ती म्हणून नावारूपास येण्यात यश आले आहे. सिंगापूरमधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेआधी पार पडलेल्या ऑलिम्पियाडमध्ये पुरुष वर्गात गुकेश आणि अर्जुन एरिगेसी तसेच महिला वर्गातील दिव्या देशमुख आणि अवंतिका अग्रवालने व्यक्तिगत सुवर्णपदक पटकावले होेते. गुकेशने पहिल्या बोर्डवर खेळत दहापैकी आठ डाव जिंकले होते. त्यावेळी 3056 रेटिंग मिळवणारा तो ऑलिम्पियाडमधील एकमेव खेळाडू म्हणून गौरवला गेला.
गुकेश हा मूळचा चेन्नईचा आहे. आई मायक्रोबायोलॉजिस्ट आणि वडील डॉक्टर अशा उच्चशिक्षित पालकांच्या संगोपनातून गुकेशची जडणघडण झाली. तथापि, गुकेशला वेगळी म्हणजे बुद्धिबळाची आवड होती. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षापासून त्याने बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली आणि 11 वर्षांनंतर आज तो जगज्जेता बनला आहे. हे यश नव्या पिढीतील प्रत्येक मुलामुलींसाठी प्रेरणादायी आहे. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडता…’ ही म्हण विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून शिकवली जाते; पण त्याचे प्रत्यक्ष जीवनात अनुकरण करून किती मोठी झेप घेता येते, याचा आदर्श म्हणून गुकेशच्या यशोगाथेकडे पहावे लागेल.
टोरंटोमध्ये कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा गुकेशने जिंकण्यापूर्वी पाच वेळा विश्वविजेता राहिलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने असे म्हटले होते की, भारतीय खेळाडू यावेळी कोणत्याही परिस्थितीत कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकू शकणार नाहीत. विशेषत: डी गुकेशला पराभवाचा सामना करावा लागेल. कारण त्याचे प्रतिस्पर्धी खूप मजबूत आहेत. पण गुकेशने आपल्या विजयाने त्याला सणसणीत प्रत्युत्तर दिले. डॉक्टर दाम्पत्याच्या पोटी जन्माला आल्यामुळे गुकेशसाठी भोवतालची सर्व परिस्थिती अनुकूल होती असे अनेकांना वाटू शकते. परंतु गुकेशला इथपर्यंत आणण्यासाठी त्याच्या पालकांनाही खूप त्याग करावा लागला. त्याची बुद्धिबळातील गती आणि चमक लक्षात आल्यानंतर वडिलांना काही निर्णय घ्यावे लागले. याचे कारण परदेशात होणार्या स्पर्धांमुळे त्यांना रुग्णांना वेळ देता येणे अशक्य होऊ लागले. त्यामुळे त्यांनी आपले क्लिनिक बंद केले. पण याचा परिणाम त्यांचे उत्पन्न मर्यादित होण्यात झाला.
पर्यायाने गुकेशच्या टूर्नामेंटचा आणि कुटुंबाचा खर्चाचा भार आई पद्मा यांच्यावर पडला. परदेशात स्पर्धा खेळण्यासाठीचा प्रचंड खर्च पेलण्यासाठी पैशांची गरज असताना गुकेशला प्रायोजक मिळत नव्हते. अशा परिस्थितीत अनेकवेळा त्याला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कर्जही घ्यावे लागले. युरोपमधील स्पर्धेदरम्यान पैसे वाचवण्यासाठी तो वडिलांसोबत विमानतळावर झोपला होता. पण आज बुद्धिबळातील अनभिषिक्त सम्राट बनत, जगज्जेता म्हणून आपले नाव या क्रीडाप्रकारामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीत गुकेशने आपल्या मातापित्यांनी केलेल्या त्यागाचे, कष्टाचे पांग फेडले आहे.
गुकेशच्या सक्सेस स्टोरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे वडील रजनीकांत हे क्रिकेटपटू होते. राज्यस्तरीय निवडीसाठी त्यांनी प्रयत्नही केले होते. असे असूनही त्यांनी आपले क्रिकेटप्रेम मुलावर न लादता त्याच्या आवडीला प्राधान्य आणि प्रोत्साहन दिले. आपल्या इच्छा मुलांवर लादू पाहणार्या पालकांसाठी ही बाब अंजन घालणारी आहे. या अद्वितीय विजयाबद्दल गुकेशचे शतशः अभिनंदन.