करोना ‘लसी’बाबत भारताचा रशियाबरोबर मोठा करार

हैदराबाद – करोनाविरोधात सर्वात प्रथम तयार केल्याचा दावा असलेल्या रशियाच्या स्पुटनिक या लसीचे उत्पादन भारतामध्ये करण्यासाठी हिटेरो या औषध निर्माण कंपनीने रशियाबरोबर करार केला आहे.

“रशियन डायरेक्‍ट इन्व्हेस्टमेंट फंड’ या रशियाच्या स्वायत्त वित्तीय संस्थेबरोबर हा करार केला गेला असून या करारानुसार हिटेरो कंपनी स्पुटनिक-5 लसीचे 10 कोटी डोसचे उत्पादन करणार आहे. 2021 च्या प्रारंभीच्या काळात हिटेरोच्या हिटेरो बायोफार्मा या उपकंपनीच्या माध्यमातून हे लस निर्मितीचे काम सुरू केले जाणार आहे.

रशियातील गामालेया सेंटर आणि आरडीआयएफ यांनी 24 नोव्हेंबर रोजी स्पुटनिक-5 लसीच्या परिणमकारकतेविषयी मोठा सकारात्मक दावा केला होता. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या तब्बल 40 हजार उमेदवारांवर केल्या गेल्या होत्या. सध्या या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष तपासले जात आहेत.

बेलारूस, युएई, व्हेनेझुएला आणि इतर देशांमध्ये या चाचण्या चालू आहेत. तर भारतामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. सुमारे 50 देशांनी स्पुटनिक-5 या लसीच्या तब्बल 1.2 अब्जाहून अधिक डोसची मागणीही नोंदवली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.