भारताच्या पुरातन वस्तू परत मिळणार

सिडनी – ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय कला संग्रहालयात असलेल्या भारताच्या 14 मौल्यवान प्राचीन कलाकृती भारताला परत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या वस्तूत मूर्ती, पेंटींग्स, फोटोंचा समावेश असून यातील अनेक कलाकृती 12 व्या शतकातील आहेत. त्याची किंमत 16 कोटी रुपये ( 30 लाख डॉलर्स) असल्याचे समजते. 1989 ते 2009 या काळात या कलाकृती या संग्रहालयात सामील केल्या गेल्या होत्या.

सिडनी मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार दुर्मिळ वस्तू तस्कर आणि डीलर सुभाष कपूर याच्या कडून त्यातील 13 वस्तू घेतल्या गेल्या होत्या. सुभाष कपूर याच्यावर प्राचीन वस्तू तस्करीचे आरोप सिद्ध झाले असून तो सध्या तुरुंगात आहे.

यापूर्वी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियातील या संग्रहालयाने 50 लाख डॉलर्स म्हणजे 27 कोटी रुपये किंमतीची अतिशय दुर्मिळ अशी पितळ्याची शिव प्रतिमा पंतप्रधान मोदी यांच्याकडे सोपविली होती. त्यानंतर आता या 14 कलाकृती परत केल्या जात आहेत.

ऑस्ट्रेलियातील भारतीय उच्चायुक्त मनप्रीत वोरा यांनी ऑस्ट्रेलियन संग्रहालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून भारतीय सरकार तर्फे त्याचे आभार मानले आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.