नवी दिल्ली – सेमी हाय स्पीड “वंदे भारत’ ट्रेनचं कंत्राट रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यासोबत केंद्र सरकारने चिनी कंपनीला जोरदार झटका दिला आहे. यासंदर्भात रेल्वेकडून पुढील आठवड्यात नव्याने कंत्राट काढण्यात येणार असून “मेक इन इंडिया’ अंतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, 44 सेमी हाय स्पीड ट्रेनच्या (वंदे भारत) निर्मितीचे कत्राट रद्द करण्यात आले आहे. एका आठवड्यात ऑर्डर काढून नव्यानं कंत्राट मागवले जातील. यामध्ये मेक इन इंडियाला प्राधान्य असेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय कंपनीला हे कंत्राट मिळावे यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील असून चिनी भागीदार असणारी कंपनी स्पर्धेत पुढे असल्याचे लक्षात आल्यानंतर कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय रेल्वेच्या चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरीकडून 10 जुलै रोजी निविदा पाठवण्यात आली होती. याव्यतिरिक्त कंत्राटासाठी निविदा भरणाऱ्यांमध्ये, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, भारत इंडस्ट्रीज, इलेक्ट्रोव्हेव्स इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, मेधा सर्वो ड्राइव्हस प्रायव्हेट लिमिटेड आणि पॉवर्नेटिक्स इक्विपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश होता.
दरम्यान, लडाखमधील गलवान खोऱ्यात सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांत तणाव आहे. यानंतर भारताने चीनविरोधात कारवाईस सुरुवात केली होती. भारताकडून 59 चिनी ऍपवर बंदीही घालण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी 15 फेब्रुवारीला दिल्ली-वाराणसी मार्गावर वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन केले होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दुसऱ्या मार्गावरील सेवा सुरु करण्यात आली होती.