अमेरिकेतील भारताचे राजदूतपदी तरनजीत सिंग संधू

वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून तरनजीत सिंग संधू यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. ते या महत्वाच्या पदाची सूत्रे स्वीकारतील, असे अमेरिकेत नियुक्‍त असलेल्या भारताच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून हर्ष वर्धन शृंगला यांच्या जागेवर संधू यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर शृंगला हे अलिकडेच भारतात परत आले आहेत. अमेरिकेतील नवीन राजदूतांच्या नियुक्‍तीबाबत्ची सर्व औपचारिक कागदपत्रे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र सरकारकडून अद्याप त्यांच्या नियुक्‍तीची औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.

संधू 24 जानेवारी 2017 पासून श्रीलंकेमध्ये भारताचे उच्चायुक्‍त म्हणून नियुक्‍त आहेत. यापूर्वी ते 1997 ते 2000 दरम्यान अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये भारताचे उपायुक्‍त होते.

वॉशिंग्टनमधील सरकारी वर्तुळामध्ये त्यांचा चांगला परिचय आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे संधू यांच्या नियुक्‍तीची घोषणा लवकरात लवकर होण्याची शक्‍यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.