भारतीय युवक संघाकडे 473 धावांची आघाडी

श्रीलंकेवर फॉलो-ऑनचे सावट; पवन शाहचे शानदार द्विशतक

हंबनटोटा: पवन शाहची शानदार द्विशतकी खेळी आणि त्याने नेहल वधेराच्या साथीत त्याने केलेल्या दीडशतकी भागीदारीनंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे येथे सुरू असलेल्या 19 वर्षांखालील युवकांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय युवक संघाने दुसऱ्या दिवशीही आपले वर्चस्व कायम राखले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय युवक संघाने आपला पहिला डाव 8 बाद 613 धावांवर घोषित केला आणि दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या युवकांची पहिल्या डावांत 4 बाद 140 अशी अवस्था करून सामन्यावरील वर्चस्व कायम राखले. श्रीलंकेचा युवक संघ 473 धावांनी पिछाडीवर असून त्यांना फॉलो-ऑन टाळण्यासाठी आणखी 273 धावांची गरज आहे. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पसिंदु सुरियाबंदारा नाबाद 51 धावांवर खेळत असून सोनल दिनुशा नाबाद 24 धावांवर त्याला साथ देत आहे.

भारतीय युवकांच्या पहिल्या डावातील 613 धावांच्या डोंगरासमोर श्रीलंकेच्या युवकांची डावखुरा वेगवान गोलंदाज मोहित जांग्राच्या भेदक माऱ्यासमोर एक वेळ 3 बाद 34 अशी अवस्था झाली होती. अखेर कामिल मिशारा आणि पसिंदू सुरियाबंदारा यांनी चौथ्या गड्यासाटी 57 धावांची भागीदारी करीत ही घसरगुंडी रोखली. मात्र सिद्धार्थ देसाईने मिशाराला बाद करीत ही जोडी फोडली. मिशाराने 94 चेंडूंत 7 चौकारांसह 44 धावांची खेळी केली.

त्यानंतर पसिंदु सुरियाबंदारा (नाबाद 51) व सोनल दिनुशा (नाबाद 24) यांनी दिवसअखेरपर्यंत पाचव्या गड्यासाठी 49 धावांची अखंडित भागीदारी करीत किल्ला लढविला. भारतीय युवक संघाकडून मोहित जांग्राने 43 धावांत 3 बळी घेतले. तर सिद्धार्थ देसाईने 20 धावांत 1 फलंदाज परतवीत त्याला साथ दिली.

त्याआधी कालच्या 4 बाद 428 धावांवरून पुढे खेळताना पवन शाहने नेहल वधेराच्या साथीत 160 धावांची भागीदारी करीत भारतीय युवक संघाला साडेपाचशेपलीकडे नेले. तीन चौकारांसह 64 धावा करणाऱ्या वधेराला बाद करून परेराने ही जोडी फोडली. बदोनी (1) व अर्जुन तेंडुलकर (14) यांच्यानंतर पवन शाह धावबाद झाल्यावर भारताने आपला पहिला डाव घोषित 8 बाद 613 धावांवर घोषित केला. पवन शाहने 332 चेंडूंचा सामना करताना 33 चौकार व 1 षटकारासह 282 धावांची खेळी केली. त्याने एका षटकांत सहा चौकार लगावले. श्रीलंका युवक संघाकडून विजयकांत वियासकांथ, कलहारा सेनारत्ने, कलाना परेरा व निपुण मलिंगा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक –
भारतीय युवा संघ- पहिला डाव- 128.5 षटकांत 8 बाद 613 घोषित (पवन शाह 282, अथर्व तायडे 177, नेहल वधेरा 64, आर्यन जुयाल 41, कलहारा सेनारत्ने 177-1, कलाना परेरा 135-1, विजयकांत वियासकांथ 94-1, निपुण मलिंगा 92-1), श्रीलंका युवक संघ- पहिला डाव- 49 षटकांत 4 बाद 140 (पसिंदू सुरियाबंदारा नाबाद 51, कामिल मिशारा 44, सोनल दिनुशा नाबाद 24, मोहित जांग्रा 43-3, सिद्धार्थ देसाई 20-1).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)