नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी आपली घोडदौड कायम राखली आहे. अमित पंघलने पुरुष गटात 52 किलो वजनी गटात अग्रस्थान मिळवले आहे. सुपरमॉम मेरी कोमने 51 किलो गटात तिसरे, मंजू राणीने 48 किलो गटात दुसरे, जमुना बोरोने 54 किलो गटात पाचवे तर, शिव थापाने 60 किलो गटात 16 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
एल. सरिता देवीला मात्र, 60 किलो गटात 25 वे स्थान मिळाले आहे. जपानमध्ये पुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या या मुष्टियोद्धांनी या क्रमवारीत चमक दाखवली आहे. गेल्या दोन मोसमांतील स्पर्धांचा आढावा घेतला तर त्यात भारतीय खेळाडूंनी सरस व सातत्यपूर्ण कामगिरी करत आपला क्रमवारीतील आलेख उंचावला आहे.