भारतीय युवकांची श्रीलंकेवर सहा गडी राखून मात 

पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना 

कोलंबो: गोलंदाजांनी बजावलेल्या प्रभावी कामगिरीनंतर कर्णधार अनुज रावतचे संयमी अर्धशतक आणि आर्यन जुयाल व समीर चौधरी यांनी त्याला दिलेली साथ यामुळे भारतीय युवक संघाने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या युवक संघाचा सहा गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारतीय युवकांनी पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सारा ओव्हल मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारण्याचा श्रीलंकेचा कर्णधार निपुण धनंजया याचा निर्णय फसला आणि श्रीलंकेच्या युवक संघाचा डाव केवळ 38.4 षटकांत 143 धावांवर गुंडाळला गेला. त्यानंतर अनुज रावत, आर्यन जुयाल व समीर चौधरी यांच्या फलंदाजीमुळे भारतीय युवक संघाने 37.1 षटकांत 4 बाद 144 धावा फटकावून एकतर्फी विजयाची नोंद केली.

अनुज रावतने 5 चौकारांसह 50 धावा करताना आर्यन जुयालच्या (20) साथीत 39 धावांची भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यावर समीर चौधरीने 35 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह नाबाद 31 धावा फटकावून अथर्व तायडेच्या (नाबाद 9) साथीत भारतीय युवकांना विजयी केले. श्रीलंकेकडून लक्षित मानसिंघेने 2 बळी घेतले.

त्याआधी कर्णधार निपुण धनंजया (33) आणि निपुण मलिंगा (38) वगळता श्रीलंकेचे बाकी फलंदाज अपयशी ठरले. भारतीय युवक संघाकडून मोहित जांग्राने 14 धावांत 2, यतिन मंगवानीने 35 धावांत 2, तर आयुष बदोनीने 37 धावांत 2 बळी घेताना चमकदार कामगिरी केली.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका युवक संघ- 38.4 षटकांत सर्वबाद 143 (निपुण धनंजया 33, निपुण मलिंगा 38, मोहित जांग्रा 14-2, यतिन मंगवानी 35-2, आयुष बदोनी 37-2)
पराभूत विरुद्ध भारतीय युवक संघ- 37.1 षटकांत 4 बाद 144 (अनुज रावत 50, समीर चौधरी नाबाद 31, आर्यन जुयाल 20, लक्षित मानसिंघे 32-2).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)