दुबई – आयसीसीने शुक्रवारी जाहीर केलेल्या टी-20 क्रिकेट क्रमवारीत भारताच्या महिला संघाने झेप घेत तिसरे स्थान प्राप्त केले आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया व इंग्लंड अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने 291 तर, इंग्लंडच्या महिला संघाने क्रमवारीत 280 गुण नोंदवले आहेत.
फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा भारतीय महिला संघ 270 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंड व भारत यांच्यात फक्त एका गुणाचा फरक आहे.
भारतीय महिला संघाच्या खेळाडू आता अमिरातीत होत असलेल्या महिला मिनी आयपीएल स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा येत्या 4 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. पुढील महिन्यापासून महिला गटाच्या स्पर्धा सुरू करण्याबाबत बीसीसीआय प्रयत्नशील आहे.