विश्वविजयाचा आनंद आजही कायम – श्रीकांत

मॅंचेस्टर – लॉर्डस मैदानावरचा तो सोनेरी क्षण आजही माझ्या स्मरणात आहे. वेस्ट इंडिजचा शेवटचा गडी आम्ही बाद केला आणि आपण विश्‍वविजेते झालो आहोत यावर आम्हा कोणाचा विश्‍वास बसत नव्हता. जेव्हा तेथील फलकावर आम्ही विजयी झाल्याची पाटी झळकली तेव्हा आमच्या डोळ्यातील अश्रुंना मोकळी वाट करून दिली हे उदगार व्यक्त केले आहेत 1983 चा विश्‍वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी.

वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आदी संघाच्या तुलनेत 1983 मध्ये आमचा संघ कमकुवत होता. साहजिकच उपांत्य फेरीचीही आम्हाला खात्री नव्हती. उपांत्य फेरीचे सामन्यांचे वेळी मी अमेरिकेला मधुचंद्रासाठी जाण्याची विमानाची तिकीटेही खरेदी केली होती. कर्णधार झिम्बाब्वेविरूद्ध झळकाविलेला तडाखेबाज शतकाने भारतास बाद फेरीत स्थान मिळवून दिले आणि भारतीय क्रिकेट क्षेत्रात सोनेरी पान लिहिले गेले असे श्रीकांत यांनी सांगितले.

भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा विश्‍वचषकावर नाब कोरले व तेथूनच देशात क्रिकेटची क्रांती घडली. या विश्‍वविजेत्या संघात सलामीबीर म्हणून श्रीकांत यांनी नावलौकिक मिळविला. श्रीकांत यांनी सांगितले की, त्यावेळी विडींज व ऑस्ट्रेलिया यांचा मोठा दबदबा होता. विडींजकडे एकापेक्षा सरस प्रभावी वेगवान गोलंदाजांचा समावेश होता तर ऑस्ट्रेलियाकडे अनुभवी व धडाकेबाज फलंदाजांची फौज होती. घरच्या मैदानावर खेळण्याचा इंग्लंड संघाला फायदा होता. त्यांच्या तुलनेत आम्ही कुठेच बसत नव्हतो. माझा नुकताच विवाह झाला होता. स्पर्धेनंतर अमेरिकेत मधुचंद्र साजरा करायचे मी ठरविले होते. लंडन ते न्यूयॉर्क या प्रवासाची मी तिकीटेही खरेदी केली होती. उपांत्य फेरीत स्थान मिळविल्यामुळे मला ही तिकीटे रद्द करावी लागली. अर्थात विश्‍वविजेत्या संघाचा एक सदस्य म्हणून मला जो मानसन्मान मिळाला, त्याच्यासारखा आनंद काही वेगळाच असतो.

श्रीकांत पुढे म्हणाले की, 2011 मध्ये विश्‍वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये मिळाले. आमच्यावेळी भरभक्कम बक्षीस देण्यासाठी मंडळाकडे फारसा पैसा नव्हता, ख्यातनाम गायिका लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमाद्वारे आमच्यासाठी निधी जमविण्यात आला.

या संघातील वेगवान गोलंदाज मदन लाल यांनी सांगितले की, ही स्पर्धा माझ्या जीवनातील संस्मरणीय स्पर्धा आहे. अंतिम सामन्यात मी व्हिवियन रिचर्डस यांना बाद केले आणि तेथूनच आमच्या विजेतेपदाचा मार्ग मोकळा झाला. रिचर्डस यांना बाद करणे सोपे नव्हते. त्यांच्या शैलीचा मी थोडासा अभ्यास केला व त्यांना बाद करण्यासाठी व्यूहरचना केली. सुदैवाने माझ्या प्रयत्नांना यश आले. या स्पर्धेतील प्रत्येक महत्त्वपूर्ण क्षण माझ्यासाठी आठवणींची शिदोरी आहे. कपिलदेवचे शतक, इयान बोथम याची विकेट घेताना कीर्ति आझादने टाकलेला फसवा चेंडू, रोमहर्षक ठरलेला अंतिम सामना व जिंकल्यानंतरचा सोनेरी क्षण या सर्वच आठवणी मला पुन्हा प्रत्ययाचा आनंद देतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.