क्रिकेट काॅर्नर : जीवाशी खेळ थांबवा

– अमित डोंगरे

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा अष्टपैलू कृणाल पंड्या करोनाबाधित आढळल्यामुळे संपूर्ण भारतीय संघच नव्हे तर श्रीलंका संघही अडचणीत आला आहे. या जबाबदार कोण, हा प्रश्‍न आता निर्माण झाला असून दोन्ही देशांची क्रिकेट मंडळेच पूर्णपणे याला जबाबदार आहेत. बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या. हे तत्व अंगिकारून बीसीसीआयची सध्या वाटताल सुरू आहे. त्यामुळेच ही मालिका आयोजित केली गेली आहे.

पूर्वी जगमोहन दालमियांना डॉलरमिया म्हटले जात होते ते याचसाठी की ते सातत्याने विविध स्पर्धांची कल्पना मांडायचे व खेळाडूंना घाण्याला जुपलेल्या बैलांप्रमाणे सातत्याने खेळायला लावायचे. हेच उद्योग त्यांच्याच राज्याच्या सौरव गांगुली व टीमकडून सुरू आहेत. पंड्या हे एक उदाहरण झाले पण आता तरी डोळे उघडा, परिस्थितीची जाण ठेवा व खेळाडूंच्या जीवाशी सुरू असलेला हा घाणेरडा खेळ थांबवा.

मुळातच जेव्हा हा दौरा ठरला तेव्हा श्रीलंकेचा संघ नुकताच इंग्लंडवरून मायदेशात परतला होता व त्यांचे फलंदाजी प्रशिक्षक, व्हिडीओ ऍनालिस्ट करोनाबाधित आढळले होते. त्यांच्यासह संपर्कात आलेल्या काही खेळाडूंनाही विलगीकरणात पाठवले गेले होते म्हणजेच एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वीच धोक्‍याची घंटा वाजली होती. तरीही आपले क्रिकेट मंडळ जागे झाले नाही.

आज संघात स्थान मिळवण्यासाठी इतकी प्रचंड स्पर्धा आहे की, खेळाडूंना मनात नसताना किंवा करोनाची भीती असतानाही खेळावेच लागते. मात्र, मग खेळाडूंमार्फतच बक्‍कळ पैसा कमावणारी बीसीसीआय त्यांच्याच सुरक्षेची काळजी घेतना दिसत नाही. पंड्या करोनाबाधित आढळला असला तरीही काही प्रश्‍न अनुत्तरीतच आहेत. मुळात बायोबबल सुरक्षेत असतानाही त्याला बाधा कशी झाली.

श्रीलंकेत भारतीय संघाचे 20 खेळाडू रवाना झाले होते. त्यातील तब्बल आठ खेळाडू कृणाल पंड्याच्या संपर्कात आल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच उरलेल्या 11 खेळाडूंमध्येच उर्वरित दोन टी-20 सामने खेळवणार का. कुठलीही मालिका आयोजित करायची व त्यातून प्रचंड पैसा कमवायचा ही वृत्ती खेळाडूंच्या जीवाशी खेळ ठरत आहे. तूमचा खेळ होतो; पण आमचा जीव जातो, हे एकदा तरी खेळाडू बीसीसीआयला सांगण्याची धमक दाखवणार का असाही प्रश्‍न विचारावासा वाटतो.

ही मालिका मुळातच का खेळवली जात आहे हेच समजत नाही कारण या संघातून कोणत्या खेळाडूला फायदा होणार आहे. कर्णधार शिखर धवनन यालाही प्रमुख संघात आता स्थान मिळण्याची सुतराम शक्‍यता नाही, मग असे असताना या मालिकेचा अट्टहास केवळ पैशांसाठीच केला जात आहे हे उघड आहे. याच नफेखोर वृत्तीमुळे खेळाडूंच्या जीवाला धोका होऊ शकतो हा साधा विचारही का केला जात नाही.

बीसीसीआयला आता निर्वाणीचा सल्ला द्यावासा वाटतो की हा खेळाडूंच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवा. आपण सातत्याने क्रायसिस मॅनेजमेंटवर भर देतो पण क्रायसिस निर्माणच होणार नाही यावर भर का दिला जात नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.