नवी दिल्ली – पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये अव्वल दर्जाच्याच खेळाडूंना स्थान मिळाले आहे. ही लढत इस्लामाबाद येथे 14 व 15 सप्टेंबर रोजी होणार आहे.
प्रजनेश गुणेश्वरन व रामकुमार रामनाथन यांची एकेरीच्या लढतींसाठी निवड झाली असून रोहन बोपण्णा व दिविज शरण यांच्याकडे दुहेरीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एकेरी व दुहेरी लढती खेळण्याची क्षमता असलेल्या साकेत मायनेनी यालाही या संघात स्थान मिळाले आहे. संघाचे न खेळणारे कर्णधार म्हणून महेश भूपती हे काम पाहणार आहेत तर प्रशिक्षकपदी झीशान अली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राखीव खेळाडू म्हणून शशीकुमार मुकुंदची निवड झाली आहे.
राष्ट्रीय निवड समितीचे मुख्य रोहित राजपाल यांनी हा संघ जाहीर केला. सुमित नागल याला दुखापतीच्या कारणास्तव संघात स्थान देण्यात आलेले नाही.