नवी दिल्ली :- इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेला येत्या नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत चालणारी ही स्पर्धा रिकाम्या मैदानांवर खेळविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी गोवा व केरळ फुटबॉल संघटनांनी तयारी दर्शवली आहे. यंदा या स्पर्धेचे 7 वे वर्ष असून या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होत असल्याने प्रायोजकांनीही हरकत घेतलेली नाही. या स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत पश्चिम बंगाल, गोवा, केरळ आणि ईशान्य भारतातील काही राज्यांनी तयारी दर्शवली होती. मात्र, करोनाचा धोका गोवा व केरळमध्ये सर्वात कमी असल्याने या दोन राज्यांपैकी एका राज्याची निवड केली जाणार आहे.
केरळपेक्षाही गोव्यात जास्त मैदाने असल्याने गोव्याला पसंती मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. करोनाचा धोका अद्याप देशात कायम असल्याने या स्पर्धेतील संघांनाही त्याबाबतच्या आदेशांचे पालन करावे लागणार आहे. सरकारने दिलेले सोशल डिस्टन्सिंगसह अन्य सर्व आदेश पाळावे लागणार आहेत.