ओटावा (कॅनडा) – भारताच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याची कॅनडामध्ये भोसकून हत्या करण्यात आली आहे. कॅनडातल्या ओन्टारिओ प्रांतात झालेल्या बाचाबाचीतून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी या विद्यार्थ्याच्या घरातच राहणाऱ्या एकाला द्वितीय श्रेणी हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.
गुरेसिस सिंग असे हत्या झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचे नाव असून तो लॅम्बटन महाविद्यालयामध्ये बिजनेस मॅनेजमेंटच्या प्रथम वर्षात शिकत होता. सार्निया भागात रविवारी त्याला भोसकण्यात आले, असे पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
१९४ क्वीन्स स्ट्रीट परिसरात भोसकण्याची घटना घडल्याचे पोलिसांना कळवण्यात आले होते. या ठिकाणी सिंग आणि क्रॉसले हंटर हे एकाच घरात रहात होते. सिंग याचा मृतदेह शोधून काढण्यात आला आणि हंटर याला ताब्यात घेण्यात आले. सिंग आणि हंटर यांच्यात स्वयंपाकघरामध्ये मारामारी झाली होती. तिथेच हंटने चाकू घेऊन सिंग याच्यावर अनेक वार केले होते, असे पोलिसांनी सांगितले.
ही हत्या वंशभेदातून झाल्यासारखे वाटत नाही. तरी देखील हत्येचा तपास आहे. या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा केले जात आहेत. या हत्येमागे गुन्हेगारी स्वरुपाचे काय कारण होते किंवा हत्या कोणत्या परिस्थितीत झाली, हे शोधले जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. लॅम्बटन कॉलेजने गुरेसिस सिंगच्या हत्येबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.