#INDvENG : उर्वरित कसोटीसाठी यादवला संधी?

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांतून शार्दुल बाहेर

मुंबई – इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. संघातून शार्दुल ठाकूरला बाहेर करण्यात आले असून वेगवान गोलंदाज उमेश यादवला संधी देण्यात आली आहे.

या मालिकेतील तिसरा आणि चौथा कसोटी सामना अहमदाबाद येथील मोटेरा मैदानावर होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत दुखापतीमुळे संघाबाहेर झालेल्या उमेश यादवला पुन्हा संधी दिली जाऊ शकते. त्याची फिटनेस टेस्ट झाल्यानंतर निवड समिती याबाबत निर्णय घेईल. शार्दुलला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. भारतीय संघात लोकेश राहुलचा समावेश करण्यात आला आहे. राहुल देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सराव करताना जखमी
झाला होता.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारताने शानदार विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. आता मालिकेतील तिसरी कसोटी जगातील सर्वात मोठ्या मोटेरा मैदानावर होणार आहे. ही कसोटी डे-नाइट होणार आहे. त्यानंतर चौथी कसोटी देखील त्याच मैदानावर होईल. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी इंग्लंडचा 2-1 किंवा 3-1ने पराभव केल्यास भारतीय संघाला फायनलचे तिकीट मिळू शकते.

शमी, सैनीबाबत लवकरच निर्णय

दुखापतीतून पूर्ण तंदुरूस्त ठरलेल्या वेगवान गोलंदाज महंमद शमी व नवदीप सैनी यांना संघात स्थान देण्यात येणार की नाही त्याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक आग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, रवीचंद्रन अश्‍विन, कुलदीप यादव, अक्‍सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, महंमद सिराज.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.