भारतीय जवानांना मिळाले स्वदेशी सुरक्षा कवच

एके-47 रायफलला देखील कवच निष्प्रभ ठरवणार

नवी दिल्ली : काश्‍मीर खोऱ्यात दहशतावद्यांशी रात्रंदिवस दोन हात करणाऱ्या जवानांना आता एक मजबूत सुरक्षा कवच मिळाले आहे. विशेष म्हणजे दहशतवाद्यांकडून जवानांवर हल्ला करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एके-47 रायफल देखील हे कवच निष्प्रभ ठरवणार आहे. कारण, स्वदेशी बनावटीचे मजबूत असे तब्बल 40 हजार बुलेटप्रुफ जॅकेट नुकतेच भारतीय सेनेच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

एसएमपीपी प्रायव्हेट लिमिटेडचे सेवानिवृत्त मेजर-जनरल अनिल ओबेरॉय यांनी याबद्दल म्हटले आहे की, आम्हाला अपेक्षा आहे की, भारतीय सेनेसाठी देण्यात आलेले बुलेटप्रुफ जॅकेटचे काम आम्ही निर्धारित वेळेच्या अगोदरच पूर्ण करू व सर्व जॅकेट सेनेकडे सुपूर्द करू. आम्हाला पहिल्या वर्षात 40 हजार जॅकेट तयार करून द्यायचे होते, मात्र आम्ही वेळेअगोदर आहोत व त्यानुसार आम्ही सेनेकडे 40 हजार बुलेटप्रुफ जॅकेट सोपवले आहेत.

सरकारकडून कंपनीला बुलेटप्रुफ जॅकेट तयार करुन देण्यासाठी 2021 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे, मात्र आम्ही सर्व जॅकेट 2020 च्या शेवटापर्यंतच तयार करू. मागील वर्षी संरक्षण विभागाकडून एसएमपीपी या भारतीय कंपनीस तब्बल 1.8 लाखांपेक्षा जास्त बुलेटप्रुफ जॅकेट तयार करण्याचे काम देण्यात आलेले आहे.

यावेळी ओबेरॉय यांनी हा देखील दावा केला आहे की, बुलेटप्रफ जॅकेटसमोर एके-47 राइफल देखील निष्प्रभ ठरणार आहे. हे स्वदेशी बनावटीचे बुलेटप्रुफ जॅकेट अत्यंत कठीण स्टीलपासून तयार झालेल्या एके- 47 राइफलच्या गोळ्या देखील झेलू शकते. शिवाय, अन्य शस्त्र देखील याच्यासमोर निष्प्रभ ठरतील. बुलेटप्रुफ जॅकेटबरोबरच जवानांसाठी विशेष हेलमेटची देखील निर्मिती करण्यात आली आहे. हे हेलमेट देखील एके- 47 राइफलच्या गोळीबाराचा सामना करण्यास सक्षम आहेत. आम्ही आपल्या जवानांच्या सुरक्षेचे पूर्ण काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.