आज बुधवारी, 15 जानेवारी रोजी भारतीय सेना दिवस आहे. यावर्षी सेना दिवस परेड प्रथमच पुण्यात होत आहे. त्यानिमित्ताने भारतीय सेनेची गौरवगाथा वर्णन करणारा हा लेख…
अशक्यप्राय आव्हानं लीलया पेलणारी आणि यशस्वी करणारी एक नाही, तर असंख्य व्यक्तिमत्त्वे भारतीय सैन्यदलात आहेत. अवघड मोहिमा त्यांच्या दैनंदिन कार्याचाच भाग असल्याने ते विशेषत्वाने सांगत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला त्याबाबत माहिती होत नाही.
4 जुलै 1999 ची पहाट. कारगिल लढाईत 18 ग्रनेडिअर्सचे घातक कमांडो टायगर हिल वर चालून गेले. समोरून गोळ्यांचा पाऊस पडत होता. बहुसंख्य साथीदार जायबंदी झाले. योगेंद्रसिंग यादवसुद्धा गोळ्या लागून जखमी झाले. तरीही ते पुढे सरकत होते. कोणी जिवंत आहे का, हे पाहण्यासाठी एक पाक सैनिक आला. योगेंद्रसिंग डोळे मिटून निपचित पडून राहिले. शत्रूंनी आपली मशीनगन रोखली. यादव यांनी नव्या जोमाने हल्ला चढवला आणि विजय मिळवला. या लढाईत त्यांना गोळ्या लागल्या होत्या आणि एक हात खांद्यातून तुटला होता.
त्याच दिवशी दुसरीकडे, 13 जम्मू-काश्मीर रायफल्सचे रायफलमॅन संजयकुमार लढत होते. शत्रूच्या अंदाधुंद गोळीबारात जिवाची पर्वा न करता ते एकटेच रांगत रांगत पाक बंकरमध्येे घुसले. हातघाईच्या लढाईत त्यांनी तीन शत्रू सैनिकांना यमसदनी धाडले; पण स्वतःही जखमी झाले. तशाही गंभीर जखमी अवस्थेत ते दुसर्या बंकरकडे गेले आणि तिथल्याही शत्रू सैनिकांना ठार केले. त्यांच्या या जबरदस्त शौर्याने बाकी साथीदारांनाही स्फुरण चढले आणि महत्त्वाचे ठाणे आपण जिंकले.
1987 मधे सियाचीन ग्लेशीअरमधील 21 हजार फूट उंचीवरचे एक ठाणे पाक सैनिकांनी बळकावले. या ठाण्याच्या उंचीमुळे पाकची बाजू वरचढ झाली. ते परत जिंकणे अत्यावश्यक होते. 29 मे 1987 रोजी 8 जम्मू-काश्मीर रायफल्सचे सेकंड लेफ्टनंट राजीव पांडे 10 सैनिकांना घेऊन गेले; पण दुर्दैवाने ते दहाही सैनिक शहीद झाले. 23 जूनला मेजर वरींदर सिंग यांच्या नेतृत्वात पुन्हा 10 जणांची टीम निघाली.
या मोहिमेला ‘ऑपरेशन राजीव’ नाव दिले होते. पण शत्रू उंचावर असल्याने मेजरसाहेबांसह 5 जण हुतात्मा झाले. उर्वरित 5 जणांसह नायब सुभेदार बाणासिंग यांनी मोर्चा सांभाळला. अतिउंचावर कमी असलेले ऑक्सिजनचे प्रमाण, खाण्यापिण्याच्या साहित्याची कमतरता, 1500 फूट उंचीची सरळ उभी बर्फाची भिंत, त्यामुळे शत्रूला लाभलेले नैसर्गिक संरक्षक कवच या सर्व प्रतिकूलतेवर मात करत बाणासिंग आणि त्यांचे सहकारी शत्रूला अनपेक्षित अशा अत्यंत दुर्गम भागातून सतत तीन दिवस फक्त बिस्किटं आणि तिथलाच बर्फ खाऊन बर्फाची ती 1500 फूट उंचीची उभी भिंत चढून 26 जून रोजी वर पोहोचले.
अतिशय कमी दृश्यमानतेत हातघाईच्या लढाईत त्यांनी 6 शत्रू सैनिकांना मारले, बाकी पळून गेले. अति उंचावरील अजिंक्य असे ते ठाणे केवळ बाणासिंग यांच्या शौर्यधैर्याने आपण जिंकू शकलो. त्यामुळेच आता सियाचीन ग्लेशीअरमधील त्या ठाण्याचे ‘बाणा टॉप’ असे नामकरण केले आहे. ऑनररी कॅप्टन बाणासिंग, सुभेदार मेजर संजयकुमार आणि ऑनररी कॅप्टन योगेंद्रसिंग यादव या तिघांनाही युद्धकाळातील सर्वोच्च शौर्यपदक ‘परमवीरचक्र’ने सन्मानित केले.
सर्वसामान्य लोकांसाठी जे अशक्य असते ते सैनिकांच्या रोजच्या दिनक्रमाचा भाग असतो. असे असंख्य किस्से आपल्याला भारतीय सैन्य इतिहासाच्या पानापानावर आढळतील. भारतवर्षाच्या सैन्यदलाला हजारो वर्षांचा देदीप्यमान इतिहास आहे.
आधुनिक भारतीय सैन्यदलाचा इतिहास 1857च्या उठावापासून दिसतो. ‘ब्रिटिश इंडियन आर्मी’ म्हणून विख्यात असलेल्या आपल्या सैन्याने पहिल्या आणि दुसर्या महायुद्धात इंग्रजांकडून लढताना जगभरातील सर्वच आघाड्यांवर अतुलनीय शौर्य गाजवले. पहिल्या महायुद्धात 12 तर दुसर्या महायुद्धात 31 भारतीय सैनिकांना ब्रिटिशांनी सर्वोच्च शौर्यपदक म्हणजे ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ने सन्मानित केले होते.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आतापर्यंत 21 जणांना परमवीरचक्र शौर्यपदकाने सन्मानित केले आहे. त्या 21 पैकी वर उल्लेख केलेले ऑनररी कॅप्टन बाणासिंग, सुभेदार मेजर संजयकुमार आणि ऑनररी कॅप्टन योगेंद्रसिंग यादव तिघेच आज जिवंत आहेत.
15 जानेवारी हा भारतीय सेना दिवस आहे. कारण स्वातंत्र्य मिळाल्यावर 15 जानेवारी 1949 रोजी लेफ्टनंट जनरल के एम करिअप्पा (नंतर पहिले फील्ड मार्शल) यांनी जनरल फ्रान्सिस रॉय बुचर यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. यावर्षी प्रथमच सेना दिवसाची परेड पुण्यात होणार आहे. जगातील तिसर्या क्रमांकाच्या अत्याधुनिक भारतीय सैन्याची ‘गौरवगाथा’ ऐकण्याची, पाहण्याची सुवर्णसंधी पुणेकरांना लाभणार आहे. ‘एडीपी 25’ या मोबाइल अॅप वर आपण ही परेड लाइव्ह बघू शकाल. भारतीय सेना दिनाच्या निमित्ताने या आणि ज्ञात अज्ञात अशा सर्वच शूरवीरांच्या शौर्याला धैर्याला मानवंदना!