नवी दिल्ली – कॅरेबियनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी बेशिस्त वर्तन करणारे भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाचे व्यवस्थापक (कार्यपालन) सुनील सुब्रमणियम यांना त्वरीत मायदेशी येण्याचे आदेश भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिले आहेत.
मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, सुब्रमणियम यांनी बेशिस्त वर्तन केल्याची तक्रार उच्चायुक्तांकडून आली आहे. त्यानुसार सुब्रमणियम यांना दौरा अर्धवट सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यासमोर त्यांची चौकशी केली जाईल. सुब्रमणियम यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांच्यावर नियमावलीनुसार कारवाई होईल.
भारतीय संघातील खेळाडू पाणी वाचवा या प्रकल्पांतर्गत कॅरेबियन प्रदेशात चित्रीकरणात सहभागी झाले होते. त्याबाबत उच्चायुक्त कार्यालयात गेले असताना सुब्रमणियम यांनी तेथील अधिकाऱ्यांबरोबर बेशिस्त वर्तन केले होते. या घटनेनंतर मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुब्रमणियम यांना अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता मात्र सुब्रमणियम यांनी त्यांच्याशी बोलण्यास टाळले असाही आरोप सुब्रमणियम यांच्यावर ठेवण्यात आला आहे.