मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक जवळजवळ दीड टक्क्यानी कोसळले. त्याचबरोबर डॉलर इंडेक्स आणखी बळकट झाल्यामुळे भारतीय रुपयाचा भाव मंगळवारी 14 पैशांनी कोसळून 86 रुपये 59 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला. गेल्या दोन दिवसापासून रिझर्व बँकेच्या हस्तक्षेपामुळे रुपया वधारत होता.
मात्र आज चलन बाजारात बरीच नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच कॅनडा आणि मेक्सिको विरोधात आयात शुल्क वाढविणार असल्याचे सांगितले.
त्यामुळे कॅनडा, मेक्सिको आणि इतर देश व्यापार युद्ध सुरू करू शकतात अशी वातावरण निर्मिती झाली आहे. अर्थात याचा परिणाम जागतिक चलन बाजारावर होण्याची शक्यता आहे. त्यातच भारतीय कंपन्या कमी नफादायक ताळेबंद जाहीर करीत असल्यामुळे शेअर बाजारात विक्री चालू आह.े परदेशी गुंतवणूक परत चालली आहे. याचा दबाव रुपयाच्या मूल्यावर काही काळ जाणवत राहणार असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.