मुंबई – भारताची निर्यात 400 अब्ज डॉलर पर्यंत वाढली असली तरी आयातही वाढली आहे. त्यामुळे चालू खात्यावरील तूट वाढण्याच्या शक्यतेमुळे भारतीय रुपयाच्या मूल्यात घट चालूच आहे.
शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 11 पैशांनी कमी होऊन रुपयाचा भाव 75.95 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. अमेरिका आक्रमक व्याज दरवाढ करणार असल्याचे सकाळी जाहीर झाल्यानंतर रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. मात्र त्यानंतर रुपयाच्या मूल्यात काही प्रमाणात सुधारणा झाली.
दरम्यानच्या काळामध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 2,279 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. त्याचाही रुपयाच्या मूल्यावर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचे दिसून येते. रुपयाच्या मूल्यावर सर्वात जास्त परिणाम महाग कच्च्या तेलाचा होत आहे. त्यामुळे रशिया- युक्रेन युद्ध जोपर्यंत संपुष्टात येत नाही तोपर्यंत रुपयाचे मूल्य स्थिर होणार नाही असे बऱ्याच विश्लेषकांनी सांगितले.