छोट्या पक्षांशी आघाडीची अपरिहार्यता

लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये यावेळी छोटे-छोटे प्रादेशिक पक्ष मोठ्या पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या पक्षांचा केंद्रातील सत्तासमीकरणांमध्ये मोठा वाटा असणार आहे. त्यामुळेच की काय मोठे राजकीय पक्षही या छोट्या पक्षांना घेऊन मोठ्या विजयाची अपेक्षा बाळगून आहेत. दुसरीकडे मोठ्या राष्ट्रीय पक्षांशी आघाडी-युती झाल्यामुळे छोट्या प्रादेशिक पक्षांचे वजनही वाढते. त्या-त्या प्रदेशातील-राज्यातील त्यांचे महत्त्वही वाढते. या दोन्ही बाजूंनी असणाऱ्या गरजेमुळे देशभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेस आणि भाजपा हे राष्ट्रीय पक्षही आपला प्रभाव राखण्यासाठी गठबंधन करण्यासाठी आग्रही राहिलेले दिसून आले. अर्थातच या आघाड्या-युत्या या केवळ आणि केवळ पक्षीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवूून होत असतात. पण छोट्या पक्षांच्या मागण्याही तुलनेने छोट्या असतात. मोठ्या पक्षांना सत्ता मिळाल्यानंतर त्या पूर्ण करणे सहजशक्‍य असते. त्यामुळेच ते जिथे स्वबळावर विजयाच्या शक्‍यता धुसर आहेत किंवा छोट्या पक्षांमुळे मतविभागणीचा धोका आहे तिथे अशा छोट्या पक्षांशी हातमिळवणी करताना, त्यांना विनवण्या करताना दिसतात. कारण लोकसभेच्या या रणांगणात प्रत्येक जागेला “मूल्य’ असते.

याचे उदाहरण 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रात आकाराला आलेल्या महायुतीच्या माध्यमातून आपण पाहिले. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातून आकाराला आलेल्या या महायुतीमध्ये समाविष्ट झालेल्या पक्षांची-संघटनांची ताकद भाजपाच्या तुलनेत फारशी नव्हती. पण राज्यातील बऱ्याच मतदारसंघात या पक्षांचा-नेत्यांचा प्रभाव होता. राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रामदास आठवलेंचा रिपाईं पक्ष, विनायकराव मेटेंची संघटना यांना सोबत घेऊन भाजपाने केलेल्या महायुतीने देशात आणि महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने कोणकोणत्या पक्षांबरोबर आघाडी केली आहे पाहूया.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अपना दल (एस) सोबत भारतीय जनता पक्षाने आघाडी केली होती. अनुप्रिया पटेल यांचा हा पक्ष आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे. 2014 मध्ये अपना दल पक्षाने दोन जागांवर निवडणुका लढल्या आणि त्यांचे दोन्हीही उमेदवार विजयी झाले. आता 2019 च्या निवडणुकांमध्येही हे दोन्ही पक्ष एकत्र लढत आहेत. अपना दल पक्षाचा उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये मोठा प्रभाव आहे. विशेषतः कुर्मी मतांसाठी हा पक्ष अधिक महत्त्वाचा मानला जातो.

दुसरा पक्ष आहे सुहेलदेव भारतीय समाज पार्टी. 2014 मध्ये अपना दलसोबतची आघाडी करुन यश मिळाल्यानंतर भाजपाने 2017 च्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमध्ये पूर्वांचलमधील काही जिल्ह्यांमध्ये चांगला प्रभाव असणाऱ्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीसोबत आघाडी केली. ओमप्रकाश राजभर प्रमुख असणाऱ्या या पक्षाचा अतिमागासलेल्या जातींमध्ये विशेष प्रभाव आहे. अर्थात, आतापर्यंत तरी भाजपाने लोकसभा निवडणुकांमध्ये या पक्षाला एकही जागा दिलेली नाही.

तिसरा पक्ष आहे निषाद पार्टी. पूर्वांचलमधील गोरखपूर आणि त्याभोवतालच्या जिल्ह्यांमध्ये मतदारांवर चांगला प्रभाव असणाऱ्या निषाद पार्टीनेही यंदा भाजपासोबत आघाडी केली आहे. अलीकडेच या पक्षाचे प्रमुख संजय निषाद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. कदाचित भाजपा निषाद पार्टीला पूर्वांचलमधील काही जागा देऊ शकते. तथापि, निषाद सांगतात की, आम्ही ही आघाडी कोणत्याही अटींशिवाय केली आहे. गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये प्रवीण निषाद यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर ही जागा जिंकली होती. आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यानंतर ही जागा रिक्‍त झाली होती. पूर्वांचलमधील 25 जागांवर या पक्षाचा प्रभाव आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.