मुंबई – बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पासपोर्ट मिळवणाऱ्या एका बांगलादेशी व्यक्तीला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. “एटीएस’ने गेल्यावर्षी उघड केलेल्या आंतरराष्ट्रीय रॅकेट संदर्भात झालेली ही तब्बल 22 वी अटक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इर्शाद शहाबुद्दीन शेख (वय 33) असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा बांगलादेशातील नौकाली येथील रहिवासी आहे. शुक्रवारी त्याला दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले, असे “एटीएस’चे पोलीस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी सांगितले.
बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून देणारे एक र्रॅकेट गेल्यावर्षी उघड करण्यात आले होते. या प्रकरणी “एटीएस’ने चेन्नई, बेंगळूरू आणि मुंबईतून काही जणांना अटक केली आहे. अशाच बनावट पासपोर्टच्या आधारे शेख शारजा येथून येत असल्याची माहिती “एटीएस’ला मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून त्याला दिल्ली विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. त्याला शनिवारी मुंबईला आणण्यात आले असून कोर्टासमोर हजर केले असता त्याला 8 ऑक्टोबरपर्यंत “एटीएस’ची कोठडी सुनावण्यात आली आहे.
शेख याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पश्चिम बंगालमधून भारतीय ओळखपत्र मिळवले होते. त्यानंतर त्याने मुंबईतून भारतीय पासपोर्ट मिळवला होता. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.