पणजी – 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने तारांकित चित्रपटांच्या मनोरंजनाची मोठी यादी जाहीर केली आहे. प्रतिनिधींना जगभरातील निवडक चित्रपटांच्या प्रीमियर आणि शोकेसेस अंतर्गत जगभरातले निवडक उत्कृष्ट चित्रपट अशा दोन्हींची मेजवानी मिळणार आहे. कान्स महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विजेता मॅड्स मिकेलसेन अभिनित “अनदर राउंड’ या चित्रपटाच्या भारतीय प्रीमियरने हा 51वा इफ्फी महोत्सव सुरू होईल. थॉमस विन्टरबर्ग दिग्दर्शित हा चित्रपट ऑस्करसाठी डेन्मार्कची अधिकृत प्रवेशिका आहे.
संदीप कुमारच्या “मेहरूनिसा’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर या महोत्सवादरम्यान होईल. या चित्रपटात फारुख जाफर मुख्य भूमिकेत आहे आणि स्त्रीच्या आयुष्याविषयक स्वप्नाची कथा यात सांगितली आहे. कियोशी कुरोसावा दिग्दर्शित जपानी चित्रपट ‘वाईफ ऑफ ए स्पाय’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात तारांकित कामगिरीची चुरस पाहायला मिळेल.
इन-कन्व्हरसेशन या सत्रात रिकी केज, राहुल रावेल, मधुर भांडारकर, पाब्लो सीझर, अबू बकर शौकी, प्रसून जोशी, जॉन मॅथ्यू मॅथन, अंजली मेनन, आदित्य धर, प्रसन्न विथानगे, हरिहरन, विक्रम घोष, अनुपमा चोपडा, सुनील दोशी, डोमिनिक संगमा आणि सुनीत टंडन सहभागी होतील.
चित्रपट रसग्रहणविषयक सत्रात भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेतील प्रा. मझहर कामरान, प्रा. मधु अप्सरा, प्रा. पंकज सक्सेना उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय ज्युरीमध्ये यावर्षी पाब्लो सीझर (अर्जेंटिना) अध्यक्ष यांच्यासह प्रसन्न विथानगे (श्रीलंका), अबू बकर शौकी (ऑस्ट्रिया), प्रियदर्शन (भारत) आणि रुबईयत हुसेन (बांगलादेश) यांचा समावेश आहे.
यंदाच्या इफ्फीमध्ये सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या प्रतिभेला आदरांजली म्हणून त्यांचे चारुलता, घरेबाईरे, पाथेरपांचाली, शतरंज के खिलाडी आणि सोनार केला हे पाच चित्रपट दाखविले जाणार आहेत. “मास्टरक्लास’ या संवादात्मक कार्यक्रमात शेखर कपूर, प्रियदर्शन, पेरी लॅंग, सुभाष घई, तन्वीर मोकामल यांची उपस्थिती असणार आहे.