लंडन – भारतीय वंशाच्या कलाकार जसलीन कौर यांना ब्रिटनमधील प्रसिद्ध टर्नर पुरस्कार मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या समारंभात कौर यांना पुरस्कार म्हणून २५ हजार पौंड (अंदाजे २६.८४ लाख रुपये) मिळाले.
भित्तीचित्रे, भित्तीशिल्प आदींचा समावेश असलेल्या त्यांच्या अल्टर अल्टर या प्रदर्शनातून त्यांनी मांडलेल्या कलाकृतींसाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या प्रदर्शनातील कलाकृती गोळा केलेल्या वस्तूंच्या फेररचनेतून साकारण्यात आल्या होत्या. तसेच या कलाकृती संगीताच्या परिणामाने ऍनिमेटेड पद्धतीने सादर करण्यात आल्या होत्या, ही खास बाब आहे.
आपल्या कलाकृतींमधून कौर यांनी व्यक्तीगत, राजकीय आणि अध्यात्मिक मूल्यांची सांगड घातल्याचे टर्नर पुरस्कारांच्या ज्युरींनी नमूद केले आहे.
स्कॉटलंडमध्ये जन्मलेल्या जसलीन कौर यांच्यावर पारंपारिक शीख कुटुंबातील संस्कार आहेत. वयाच्या तिशीमध्ये असलेल्या कौर यांनी ज्वेलरी डिजाईनचे प्रशिक्षण घेतले असून त्या कलेचा वापर अन्य वस्तूंच्या एकत्रिकरणातून नवीन कलाकृती निर्माण करण्यासाठी त्यांनी केला.
टर्नर पुरस्कार १७७५ ते १८५१ या कालावधीतील सुधारणावादी चित्रकार जेएमडब्लू टर्नर यांच्या स्मरणार्थ दिला जातो. ब्रिटनमधील कलाकारांना विशेष उल्लेखनीय प्रदर्शनासाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.