करोनाबाबत भारतीय वंशाच्या डॉक्‍टरने दिला गंभीर ‘इशारा’

न्यूयॉर्क – अमेरिकेतील नव्या जो बायडेन प्रशासनात महत्वाच्या पदावर अर्थात सर्जन जनरल या पदावर नियुक्ती करण्यात आलेले भारतीय वंशाचे डॉक्‍टर विवेक मूर्ती यांनी करोनाच्या संदर्भात सावधानतेचा इशारा दिला आहे. करोनाचा विषाणू सातत्याने आपले स्वरूप बदलत असल्यामुळे अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेची करोनाच्या संदर्भातील रणनीती तयार करणाऱ्या पथकाचे प्रमुख सदस्य असलेल्या डॉ. मूर्ती यांच्या म्हणण्यानुसार हा विषाणू सातत्याने नवे रूप धारण करत असून विशेष खबरदारी घेण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. जीनवर आधारीत देखरेखीसाठी तसेच कॉन्टॅक्‍ट ट्रेसींगसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागणार आहे.

आपल्याला ट्रेसिंगचे काम अत्यंत वेगाने करावे लागणार आहे. तसे केले तरच नव्या स्वरूपाचा मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज राहु शकू. एबीएक्‍स न्यूजशी बोलताना ते म्हणाले की मास्क घालण्यावर सतत आणि विशेष भर द्यावा लागणार आहे.

त्याचप्रमाणे बंद सभागृहांत घेतले जाणारे कार्यक्रम टाळावे लागतील. डॉ. मूर्ती हे बराक ओबामा यांच्या कार्यकाळातही अमेरिकेचे सर्जन जनरल होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्यांनी अचानक आपले पद सोडले होते. आता बायडेन यांनी त्यांच्यावर पुन्हा तीच जबाबदारी सोपवली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.