भारतीय मोबाईल कंपन्या आशावादी नाहीत

जास्त व्याज दरावरील भांडवलामुळे वाढतो उत्पादन खर्च

कोलकत्ता- सरहद्दीवरील तणावामुळे सध्या भारतात चीन विरोधी वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिक चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भाषा बोलत आहेत. मात्र भारतातील मोबाईल कंपन्या यामुळे परिस्थितीत फार फरक पडेल याबाबत आशावादी नाहीत. कारण भारतातील कंपन्यांना अधिक व्याजदराच्या भांडवलाचा उपयोग करून आपली उत्पादने तयार करावी लागतात. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढतो आणि चिनी कंपन्या पेक्षा भारतीय मोबाईल महाग पडतात.

याबाबत बोलताना कार्बन हा मोबाईल फोन तयार करणाऱ्या जयना समूहाचे कार्यकारी संचालक अभिषेक गर्ग यांनी सांगितले की, सध्या आमच्यासाठी पूरक वातावरण निर्माण झाल्यासारखे वाटत आहे. मात्र आम्हाला मिळणारे भांडवल अधिक व्याजदराचे असते. त्यामुळे आमचा खर्च वाढत जातो. त्या तुलनेत चिनी कंपन्यांना भांडवल स्वस्त मिळते. त्याचबरोबर बऱ्याच दिवसाच्या नफ्यामुळे चीनी कंपन्या कमी किमतीवर आपली उत्पादने आक्रमक होऊन विकू शकतात. या परिस्थितीचा आढावा घेऊन सरकारने जर हस्तक्षेप केला तर भारतीय मोबाईल कंपन्या बाजारपेठेतील आपले स्थान पुन्हा मजबूत करू शकतील. चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेतील प्रभाव वाढविल्यानंतर भारतातील मोबाईल कंपन्या फारशा सक्रिय राहिलेल्या नाहीत. त्यातील काही कंपन्या चीनमधून आलेल्या फोनचीचा पुरवठा करतात.

याबाबत बोलताना लावा इंटरनॅशनल या भारतीय फोन उत्पादक कंपनीने म्हटले आहे की, चीन विरोधात फक्त भावनिक राग येऊन उपयोगाचे नाही. यासाठी आपल्याला कार्यक्षमता वाढवून चिनी उत्पादनासारखी उत्पादने विकसित करावी लागतील. यासाठी अनेक आघाड्यावर आपल्याला सुधारणा कराव्या लागतील. आपण जबाबदारीने आपली कौशल्य वाढविण्याची गरज आहे. त्याचबरोबर चिनी कंपन्यांना जशा प्रकारचे भांडवल उपलब्ध होते तसेच भांडवल आपल्याला उपलब्ध होण्याची गरज आहे.

अन्यथा काही दिवसानंतर येरे माझ्या मागल्या असे होऊ शकेल. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हरिओम राय यांनी सांगितले की, आपल्याला स्पर्धा करूनच यातून जिंकता येईल. केवळ भावनिक बहिष्काराचा फारसा उपयोग होणार नाही. चीनी कंपन्यांना मोठ्या भांडवलाचा आधार असल्यामुळे त्या केवळ उत्पादन स्वस्तात करू शकतात असे नाही तर आक्रमकरित्या मार्केटिंग करू शकतात. यामध्ये आपण कमी पडतो असे ते म्हणाले. भारतीय मोबाईल कंपन्यांची उलाढाल कमी होऊ लागल्यानंतर बॅंकांनी भारतातील मोबाईल कंपन्यांना कर्जपुरवठा करण्याबाबत हात आखडता घेतला असे त्यांनी सांगितले.

चीन विरोधात तयार झालेल्या वातावरण निर्मितीमुळे आता भारतीय मोबाईल कंपन्या पुन्हा उभे राहण्यासाठी हालचाली करीत असून कार्बन, लावा इंटरनॅशनल, मायक्रोमॅक्‍स या कंपन्या लवकरच आपले नवे मोबाईल भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.