नवी दिल्ली – फ्रान्समध्ये चर्चमध्ये झालेल्या हिंसाचाराचा अभिनेता नसरुद्दिन शाह, गीतकार जावेद अख्तर, वकील प्रशांत भूषण, लेखक तुषार गांधी यांच्यासह 100 प्रख्यात व्यक्तींनी निषेध केला आहे. काही राजकीय नेत्यांनी या घटनांच्या समर्थनार्थ केलेल्या विधानांचाही निषेध करण्यात आला.
या पत्रकावर 130 जणांच्या स्वाक्षरी आहेत. त्यात शबाना आझमी, स्वरा भास्कर, झीशान अय्यूब, फिरोझ खान, कबीर खान, अंजुम राजबाली, आनंद पटवर्धन, ज्यलिओ रिबेरो आणि अब्दूल अझिज लोखंडवाला यांचा समावेश आहे. श्रध्देच्या नावाखाली दोन माथेफिरूंनी फ्रान्समध्ये अलिकडेच केलेल्या हत्यांचा तीव्र निषेध करतो, असे या निवेदनात म्हटले आहे.
या थंड डोक्यांनी केलेल्या हत्यांचे भारतीय मुस्लिमांचे स्वयंघोषित तारणहार असणाऱ्यांनी समर्थन केले. काही देशांच्या प्रमुखांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या विचित्र तर्काने आम्ही अस्वस्थ झालो आहोत, असे या निवेदनात मलेशियाच्या नेते महाथिर महंमद यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने म्हटले आहे.
अन्य घटनेचे उदाहरण देऊन या घटनांचे समर्थन होऊ शकत नाही. दोन चुका मिळून एक बरोबर असे असू शकत नाही. कोणत्याही धर्माच्या नवाने होणाऱ्या घृणास्पद कृत्यांचे जर तरने केलेले कोणतेही समर्थन आम्हाला मान्य नाही. कोणताही देव, दैव, देवता, प्रेषित अथवा संत हत्यांचे अथवा मानवी दहशतवादाचे समर्थन करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
फ्रान्समधील मुस्लिमांच्या मुस्लिम फेथ या संघटनेने या हत्यांच्या निषेधार्थ ईद साजरी केली नाही. याबद्दल या गटाने त्या संस्थेचे कौतूक केले आहे. या नामवंतांमध्ये डॅनिश जावेद, मल्लिका साराभाई, मेधा पाटकर आणि मृदुला मुखर्जी यांचाही समावेश आहे.