टोक्यो ऑलिम्पिक : यंदाच्या ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताला पदक मिळण्याची सर्वाधिक आशा असणाऱ्या हॉकी स्पर्धेत भारताने विजयी सुरुवात केली आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत 3-2 च्या फरकाने सामना खिशात घातला आहे. कर्णधार मनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वाखाली हा अप्रतिम विजय भारताने मिळवला आहे. सामन्यात हरमनप्रीत सिंगने 2 आणि रूपिंदर पाल सिंगने एक गोल केला.
Faster, Higher, Stronger – Together 🇮🇳
This is how we played our Olympic opener against New Zealand. 📸#NZLvIND #HaiTayyar #Tokyo2020 #IndiaKaGame #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/D1cpazsybG
— Hockey India (@TheHockeyIndia) July 24, 2021
सामन्यात पहिला गोल न्यूझीलंड संघाने केला. कीवी टीमने सामन्याच्या पहिल्या 2 मिनिटांतच गोल करत 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर भारताला मिळालेल्या एका पेनल्टी कॉर्नरच्या जोरावर भारताने एक गोल करत सामन्यात बरोबरी साधली. भारताच्या हरमनप्रीत सिंगने हा पहिला गोल केला. मॅचच्या पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ 1-1 च्या बरोबरीवर होते.
सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताने आपली पकड मजबूत करत न्यूझीलंडच्या गोलपोस्टमध्ये दूसरा गोल दागला. भारताच्या रूपिंदर पाल सिंगने हा गोल केला. त्यानंतर पुन्हा हरमनप्रीत सिंगने तिसरा गोल करत भारताला 3-1 ची आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस न्यूझीलंडच्या खेळाडूने गोल करत सामना 3-2 च्या स्थितीत आणून ठेवला. ज्यानंतर अखेरच्या काही मिनिटांमध्ये न्यूझीलंडने गोल करण्याचे खूप प्रयत्न केले त्यांना 3 पेनल्टी कॉर्नर देखील मिळाले. पण भारतीय गोलकीपर श्रीजेश उसकीने अप्रतिम गोलकिपींग करत भारताचा विजय निश्चित केला. भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया संघासोबत रविवार खेळवला जाईल.