टोकियो –भारताच्या पुरुष हॉकी संघाने तब्बल चार दशकांचा दुष्काळ संपवताना जर्मनीचा 5-4 असा पराभव करत ब्रॉंझपदक पटकावले. या सामन्यात अखेरच्या सहा सेकंदांत श्रीजेशने केलेल्या अफलातून बचावाच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला.
उपांत्य फेरीत झालेला पराभव मागे टाकत भारताने अत्यंत सरस खेळ या सामन्यात केला. या
स्पर्धेच्या इतिहासात आजवर हॉकीत आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताला 1980 सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक मिळाले होते. उपांत्य लढतीत बेल्जियमविरुद्ध झालेल्या चुका दुरुस्त करत भारताने तब्बल 41 वर्षांनंतर पदकाचे स्वप्न साकार केले. अत्यंत रोमहर्षक सामन्यामध्ये भारताने अगदी शेवटच्या सेकंदाला विजय निश्चित केला.
सामना अखेरच्या मिनिटात भारताची आघाडी संपवत बरोबरी करण्यासाठी जर्मनीने अटोकाट प्रयत्न केले. मात्र, भारताने त्यांचे हे प्रयत्न फोल ठरवले. जर्मनीला सामन्यातील आव्हान राखण्यासाठी तसेच हा सामना पेनल्टी शूट आऊटपर्यंत आणण्यासाठी बरोबरी करणे गरजेचे होते. सामन्यातील शेवटचे सहा सेकंद बाकी होते तेव्हा जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ही जर्मनीची शेवटची संधी होती. कारण हा गोल झाला असता तर सामना बरोबरीत सुटणार होता तर दुसरीकडे भारताने हा गोल वाचवल्यास 41 वर्षांनी पदकावर नाव कोरले जाणार होते.
पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणाऱ्या गोलकीपर श्रीजेशने हा प्रयत्न फोल ठरवला आणि भारतीय खेळाडूंनी जल्लोष केला. हा गोल झाला असता तर सामना अतिरिक्तवेळेत गेला असता आणि तिथेही गोल झाला नसता तर पेनल्टी शूटआऊटने विजेता निश्चित करण्यात आला असता. मात्र, भारतीय संघाने आपला संयम कायम राखत सामना 5-4 अशा फरकाने जिंकला व सांघिक खेळाच्या जोरावर तब्बल 41 वर्षांनी ब्रॉंझपदकावर नाव कोरले.