गोड्या पाण्यातील “इंडियन फ्लॅपशेल टर्टल’ आढळला

विद्यार्थ्याने वाचवले कासवाचे प्राण

सांगवी – औंध रोड चौकाजवळील ओढ्याच्या कडेला पांढऱ्या रंगाचे गोड्या पाण्यातील “इंडियन फ्लॅपशेल’ जातीचे कासव आढळले. एका विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखल्याने या कासवाला जीवनदान मिळाले.

खेळत असताना विनायक विजय लोखंडे याला ओढ्याच्या कडेला कासव दिसले. ते पांढरे असल्यामुळे त्वरित लक्ष गेले. जवळची दोन-तीन मुलं त्या कासवाला दगड मारत होती. ते विनायकने पाहिले, दगड मारणारी मुलं ऐकणारी नव्हती म्हणून पटकन ते कासव पकडून घरी घेऊन आला. घरी आल्यावर विनायकने झालेला प्रकार त्यांचे शेजारी संजय गायकवाड यांना सांगितला. गायकवाड यांना कासवाबद्दल माहिती नसल्यामुळे त्यांनी अलाईव्हचे सदस्य व सर्पमित्र राजेंद्र कांबळे यांना संपर्क केला.

राजेंद्र काबळे यांनी ते येईपर्यंत कासवाला पाण्यात ठेवण्याच्या आणि भाजीपाला खाण्यास देण्याच्या सूचना दिल्या. तसेच कासवाच्या सर्वच प्रजाति अवैध शिकारीमुळे धोक्‍यात आलेले असल्यामुळे कोणालाही न दाखवण्याच्या आणि वारंवार न हाताळण्याचा महत्त्वाच्या सूचना दिल्या. विनायक आणि त्याचे मित्र सुमित मोरे, अंशुल संजय गायकवाड यांनी या सूचना गांभीर्याने घेत कासवाची सुश्रुषा सुरू केली.

सर्पमित्र राजेंद्र कांबळे आल्यावर त्यांनी कासवाला काही जखम वगैरे तर नाही ना ते तपासले. कासव संपूर्ण पांढरे असल्यामुळे त्यांना ओळख पटणे अवघड झाले आणि मार्गदर्शनासाठी वन्यजीव अभ्यासक व अलाईव्हचे अध्यक्ष उमेश वाघेला यांना संपर्क केला. फोटो पाठवून त्यांना झालेला प्रकार सांगितल्यानंतर हे गोड्या पाण्यातले इंडियन फ्लॅपशेल टर्टल असल्याचे समजले. मुळा नदीत या कासवाला करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.