मुंबई – करोनापासून काळजी घ्यावी यासाठी पाकिस्तानातील लीगमधील एका संघाने चाहत्यांना संदेश देताना विनाकारण भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा नोबॉल टाकल्याचा फोटो पोस्ट केला व लाईन क्रॉस करु नका घरातच राहा, अशी कमेंट केली. त्याला सणसणीत चपराक देताना भारतीय चाहत्यांनी इंग्लंडमध्ये स्पॉट फिक्सिंग करताना मुद्दाम नोबॉल टाकणाऱ्या महंमद अमिर याच्या नोबॉलचा फोटो पोस्ट करत पाकिस्तानची चांगलीच जिरविली आहे.
पाकिस्तान क्रिकेट लीगमधील (पीसीएल) इस्लामाबाद युनायटेड संघाने बुमराहचा नो बॉल टाकतानाचा फोटो पोस्ट केला. हा फोटो 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात झालेल्या या सामन्यात भारताला 180 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी बुमराहने पाकिस्तानच्या फकर जमानला बाद केले होते. मात्र, हा चेंडू नोबॉल असल्याने त्याला जीवदान मिळाले व त्याने शतकी खेळी केली होती. हाच फोटो पोस्ट करत करोनाचा संदेश देण्यात आला होता.
भारतीय चाहत्यांनीही त्याला तोडीसतोड उत्तर देत आमिरने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत स्पॉट फिक्सिंग करताना टाकलेल्या नो बॉलचा फोटो पोस्ट केला. मुद्दाम नो बॉल टाकल्याबद्दल आमीरवर 5 वर्षांची बंदी लावण्यात आली होती. हा फोटो पोस्ट करत आपल्या मर्यादेतच राहा, असे सांगत पाकिस्तानचेच दात त्यांच्याच घशात घातले.