India GDP Growth Rate: भारताची अर्थव्यवस्था ही सध्या जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक वेगाने वाढत आहे. आता जागतिक बँकेकडूनही याबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक बँकेकडून पुढील दोन आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर हा 6.7 असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वृद्धी दराच्या बाबतीत भारताची अर्थव्यवस्था सर्वात पुढे असेल, तर अमेरिका आणि चीन सारख्या देशाची आर्थिक गती मंदावेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जागतिक बँकेने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर आर्थिक वर्ष 2022 मध्ये 9.7 टक्के, आर्थिक वर्ष 2023 मध्ये 7 टक्के आणि आर्थिक वर्ष 24 मध्ये 8.2 टक्के एवढा होता.
आता जागतिक बँकेने एप्रिल 2025 पासून सुरू होणाऱ्या पुढील 2 वर्षांसाठी भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर 6.7 असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर सध्याचे आर्थिक वर्ष एप्रिल 2024 ते मार्च 2025 पर्यंतचा वृद्धी दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. जागतिक बँकेनुसार, भारताच्या सेवा क्षेत्रामध्ये सातत्याने वाढ दिसून येण्याची शक्यता आहे. तसेच, सरकार उत्पादन क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करत असल्याने यातही चांगली स्थिती असेल.
भारताच्या तुलनेत चीन आणि अमेरिकेचा वृद्धी दर कमी राहण्याचा अंदाज आहे. सध्याच्या आर्थिक वर्षाच्या चीनचा अंदाजित वृद्धी दर 4.5 टक्के राहील. तर पुढील वर्षी यात घट होऊन 4 टक्के होईल. तर जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा पुढील आर्थिक वर्षातील वृद्धी दर 2 टक्के असेल, असा अंदाज आहे.