नवी दिल्ली – जगभरात भारतीय पदार्थांची नावे आवर्जून घेतली जातात. कारण भारतीय आहार हा एक परिपूर्ण आहार मानतो जातो. आता वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरने (डब्ल्यूडब्ल्यूएफ) जारी केलेल्या लिव्हिंग प्लॅनेटच्या २०२४ च्या अहवालामध्ये भारतीय अन्न व्यवस्था जगभरातील देशांपेक्षा पृथ्वीसाठी आणि पर्यावरणासाठी सर्वोत्तम अन्न व्यवस्था असल्याचं म्हटलं आहे.
या अहवालात भारतातील अन्न व्यवस्थेची प्रशंसा करण्यात आली आहे. जगभरातील देशांमध्ये भारताचा अन्न वापराचा नमुना सर्वात टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच जगभरातील सर्व देशांनी भारताचा हा पॅटर्न स्वीकारला तर २०५० पर्यंत पृथ्वीवरील होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होतील, असेही अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, भारतानंतर इंडोनेशिया, चीन, जपान आणि सौदी अरेबिया या देशांना सर्वोत्तम अन्नप्रणालींमध्ये स्थान देण्यात आले आहे. तसेच अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील आहार पद्धतींना सर्वात खराब दर्जा देण्यात आला आहे.
जगभरातील सर्व देशांनी भारतातील अन्न व्यवस्था किंवा खाद्यपदार्थ स्वीकारल्यास २०५० पर्यंत आपल्या पृथ्वीवरील ८४ टक्के संसाधने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी असतील. याचा अर्थ १६ टक्के संसाधने वापरली जाणार नाहीत. त्यामुळे जागतिक तापमानवाढही कमी करण्यास मदत होईल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होईल.
तसेच १.५° डिग्री सेल्सियसपेक्षा खूपच कमी उष्णता उत्सर्जित होईल. त्यामुळे पर्यावरण सुधारेल, असेही या अहवालामध्ये म्हटले आहे.
रम्यान, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांच्या आहार पद्धतींना सर्वात वाईट मानांकन आले आहे. या देशांमध्ये चरबीयुक्त आणि साखरयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या अहवालात भारतातील लोकांच्या बाजरीचे सेवन करण्याच्या पद्धतीचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच ते हवामानासाठीही चांगले असल्याचे अहवालात म्हटले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा बाजरी उत्पादक देश असून जो जागतिक उत्पादनाच्या सुमारे ४१ टक्के आहे. बाजरीच्या वापराला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम सुरु असल्याचे म्हटले आहे.