Indian currency । तुम्हा-आम्हाला कळतंय तस आपल्या प्रत्येक नोटवर महात्मा गांधींचा फोटो पाहिला आहे. भारतीय चलनावर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो असणे ही एक सामान्य गोष्ट असे सर्वांनाच वाटते, पण महात्मा गांधी भारतीय चलनावर कसे आले? महात्मा गांधींच्या आधी भारतीय चलनी नोटांवर कोण होते? महात्मा गांधींव्यतिरिक्त, नोटांसाठी रिझर्व्ह बँकेकडे कोणते पर्याय होते? याच सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेऊ…
भारतीय चलनी नोटांमधून महात्मा गांधींचे फोटो काढून टाकण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले आहेत. काही लोकांनी बापूंच्या जागी सुभाषचंद्र बोस यांचे चित्र लावण्याची बाजू मांडली तर काहींनी भगतसिंग यांचे चित्र लावण्याची मागणी केली.परंतु, महात्मा गांधी जिथे होते तिथेच राहिले. आता थेट विषयाकडे येऊया.
जर महात्मा गांधी नाहीत तर कोण? Indian currency ।
भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी, ब्रिटिश काळात भारतीय चलनावर ब्रिटिश राजांचे फोटो असायचा. राजा जॉर्ज पाचवे यांचे फोटो आपल्या भारतीय चलनी नोटांवर छापण्यात येत होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाल्यानंतरही, देशाचे संविधान तयार होईपर्यंत या नोटा छापल्या जात राहिल्या. दरम्यान, स्वातंत्र्यानंतर सर्वांचा असा विश्वास होता की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्र भारतीय चलनी नोटांवर असावे, परंतु अशोक स्तंभावर एकमत झाले. १९५० मध्ये पहिल्यांदा २, ३, १० आणि १०० रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या. या नोटांवर अशोक स्तंभाचे चित्रही छापण्यात आले होते.
बापूंच्याही आधी नोटांवर यांचे चित्र Indian currency ।
स्वातंत्र्यानंतरही भारतीय चलनात प्रयोग सुरूच राहिले. १९५० ते ६० च्या दरम्यान, नोटांवर वाघ आणि हरीण यांसारख्या प्राण्यांची चित्रे देखील छापली जात होती. याशिवाय, बदलत्या भारताचे म्हणजेच हिराकुड धरण, आर्यभट्ट उपग्रह, बृहदेश्वर मंदिर यांचे चित्र देखील नोटांवर छापण्यात आले होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, गांधींव्यतिरिक्त, चलनी नोटांवर छापण्यासाठी आरबीआयकडे आलेल्या चित्रांच्या यादीत जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांसारख्या देवतांचाही समावेश होता.
महात्मा गांधींचे चित्र चलनी नोटांवर कधी दिसले?
१९६९ मध्ये महात्मा गांधींच्या १०० व्या जयंतीनिमित्त, भारतीय चलनावर त्यांचे चित्र पहिल्यांदाच छापण्यात आले. यामध्ये महात्मा गांधी बसलेले दाखवण्यात आले होते, त्यांच्या मागे सेवाग्राम आश्रमाचे फोटो होते. त्यानंतर १९८७ पासून भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमितपणे भारतीय चलनावर महात्मा गांधींची छपाई सुरू केली. तेंव्हापासून ते आजपर्यंत भारतीय चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो छापण्यात येतो….