क्रिकेट काॅर्नर : रनमशीन गंजले

-अमित डोंगरे

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला येत असलेले अपयश सातत्याने भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. एकीकडे सामने मायदेशात होत असूनही कोहलीला खेळपट्टीवर उभे राहण्यास देखील जमताना दिसत नाही. जागतिक क्रिकेटमधील रनमशीन असा ज्याचा सार्थ उल्लेख केला जात आहे त्याच मशीनला गंज चढलेलाही पाहावा लागत आहे.

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार, आजच्या घडीचा जगातील सर्वात अव्वल फलंदाज असे कोहलीबाबत बोलले जाते. एकेकाळी भारतीय संघाच्या फलंदाजाची सर्व मदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर याच अपेक्षांचे ओझे असायचे आता कोहलीवर असते. एक मुळ फरक होता व आहे की, सचिनच्या जोडीला संघात राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग व व्हीव्हीएस लक्ष्मण असे तगडे फलंदाज असायचे. कोहलीच्या नेतृत्वात एक रोहित शर्मा वगळता तसा तगडा फलंदाज नाही.

आता काही डोकी म्हणतील की चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, ऋषभ पंत आहेत की. पण त्यांचा दर्जा या वरील मातब्बर फलंदाजांइतका नाही हे तर उघड आहे. तरी देखील ऑस्ट्रेलियात तसेच मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत अफलातून जिगर दाखवली मात्र, अहमदाबादमध्ये दाखल झाल्यापासून त्यांच्याही फलंदाजीला गंज चढल्याचे दिसून आले आहे.

कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा गाभा आहे, त्याच्या मुशीतून तयार झाल्यानंतर खेळपट्टी किंवा गोलंदाजी कशीही असो तिथे थांबून राहिले की धावा होतातच हा साधा नियमही या फलंदाजांना समजलेला नाही याचे आश्‍चर्य वाटते. चौथ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा संपूर्ण संघ बाद झाला. त्यानंतर भारताचाही पहिला बळी गेला. आताही तिसऱ्या सामन्याच्या खेळपट्टीवरून सुरु झालेले कवित्व संपलेले नसतानाच चौथ्या कसोटीसाठीच्या खेळपट्टीवरही तोंडसुख घ्यायला सुरुवात झाल्याचे समोर येत आहे. मात्र, खरेतर दोन्ही कसोटींची खेळपट्टी इतकी वाईट नव्हती की त्यावर धावाच होणार नाहीत.
फलंदाजांची मानसिकता कसोटी सामन्यासाठी असावी लागते आणि तीच नेमकी दोन्ही संघांच्या फलंदाजांकडे नाही.

कोहलीच्या बाबत बोलायचे तर गेल्या वर्षापासून त्याच्या धावांचा धबधबा आटला आहे. त्याला या काळात एकही शतकी खेळी करता आलेली नाही. सातत्याने तो स्टीअर, ग्लान्स, स्क्वेअरड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात बाद होत आहे. हे त्यालाही समजत असेल की काहीतरी चुकत आहे. कळते पण वळत नाही अशी त्याची स्थिती बनल्याचे स्पष्ट दिसत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी त्यानेच बॅक टू द बेसिक्‍स, करणे आवश्‍यक आहे.

नेटमध्ये सराव करताना कोहलीच्या बॅटच्या बरोबर मध्ये चेंडू कनेक्‍ट होत असल्याचे दिसून आले मग प्रत्यक्ष सामन्यात त्याच्या बॅटला काय होते हेच समजेनासे झाले आहे. सचिनच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने विक्रमांचे मनोरे रचायला सुरुवात केली मात्र, गेल्या काही मालिकांपासून त्याला पहिल्या 10-20 धावा करतानाही जड जात आहे. असे का होते हा प्रश्‍न चाहत्यांनाच नव्हे तर क्रिकेट समीक्षकांनाही पडलेला आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी आता भारतीय संघातील कोहलीसह सगळेच प्रमुख फलंदाज प्रयत्न करतील का असाही प्रश्‍न पडलेला आहे. कारण हा सामना संपल्यावर भारतीय संघ टी-20 तसेच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर लगेचच आयपीएल स्पर्धा सुरू होत आहे. त्यामुळे भारतीय संघ पुढील जवळपास चार ते पाच महिने कसोटी सामने खेळणार नसल्याने व आता या चौथ्या कसोटीतील दुसरा डावच राहिल्यामुळे कोहलीच काय अन्य फलंदाजही हे अपयश फारसे मनावर घेतील असे वाटत नाही.

तरीही प्रश्‍न एकच उरतो की ज्याला आज जागतिक क्रिकेटचे रनमशीन म्हटले जात आहे, त्यावर चढलेला गंज निदान दुसऱ्या डावातही उतरावा हीच अपेक्षा आहे. हा सामना भारतीय संघासाठी कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचा असल्याने भारतीय संघाने अपयशावर मात करणे हीच महत्वाची गरज उरली आहे व त्यासाठी रनमशिनला भरात येणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.