दिल्ली – चीनमधील सर्वात मोठी इ कॉमर्स कंपनी ‘अलिबाबा’ समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांना भारतीय न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. भारतीय कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीने कामावरुन काढून टाकल्या प्रकरणी ही नोटीस पाठवली आहे.
कंपनीने कारवाई केलेल्या या कर्मचाऱ्याने कंपनीच्या ऍपवर सेन्सॉरशीप असणाऱ्या आणि खोट्या बातम्या असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतरच या कर्मचाऱ्याने त्याच्यावर कारवाई केल्याचा दावा कागदपत्रांच्या आधारे केला असल्याचे एका खासगी वृत्तसंस्थेने म्हटले.
भारताने अलिबाबा समूहाच्या यूसी न्यूज, यूसी ब्राउझर आणि इतर 57 चीनी ऍपवर बंदी घातल्यानंतर हे प्रकरण समोर आले. भारत आणि चीन दरम्यान लडाखमध्ये सुरू असणाऱ्या संघर्षामुळे चिनी ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला.
भारत सरकारने बंदी घातलेल्या ऍपच्या सर्व कंपन्यांकडून लेखी स्पष्टीकरण मागवले आहे. यामध्ये कंपनी काही माहिती सेन्सॉर करते का किंवा इतर देशाच्या सरकारसाठी काम करते का अशा प्रश्नांसंदर्भात स्पष्टीकरण मागवले आहे. या बंदीचा चीनने निषेध केला.
न्यायालयामध्ये 20 जुलै रोजी अलिबाबा ग्रुपच्या यूसी वेब कंपनीमध्ये काम करणाऱ्या पुष्पेंद्र सिंग परमार यांनी चीनच्या विरोधातील माहिती कंपनीच्या ऍपवर सेन्सॉर केल्याचा आरोप करणारा अर्ज दाखल केली.
तसेच यूसी ब्राउझर आणि यूसी न्यूज या ऍपवर सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होणाऱ्या खोट्या बातम्या दाखवल्या जात असल्याचे परमार यांनी म्हटले. गुरुग्रामच्या दिवाणी जिल्हा न्यायालयामध्ये हा खटला दाखल झाला आहे.
या प्रकरणात अलिबाबा, जॅक मा यांच्याबरोबर कंपनीशी संबंधित एक डझनभर लोकांना आणि कंपनीच्या वेगवेगळ्या विभागांना न्यायलयाने नोटीस पाठवली आहे. सर्वांनी प्रत्यक्ष किंवा वकिलातर्फे 29 जुलैच्या सुनावणी रोजी न्यायालयासमोर हजर रहावे असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
तसेच कंपनी आणि या प्रकरणाशी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 30 दिवसांमध्ये न्यायालयासमोर लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.